देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरातील वाकाण वस्ती, वाळूंज वस्ती, देठे वस्ती तसेच कोल्हार रस्त्याकडील देवगिरे वस्ती भागात शुक्रवारी रात्री सुम

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरातील वाकाण वस्ती, वाळूंज वस्ती, देठे वस्ती तसेच कोल्हार रस्त्याकडील देवगिरे वस्ती भागात शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजल्यापासून ड्रोन, विनानंबरच्या मोटारसायकली आणि स्कॉर्पिओ वाहनांमधून ३० ते ४० हत्यारबंद तरुण फिरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री राहुरी तालुका येथील गडदे आखाडा, गुहा तसेच इतर दोन ते तीन ठिकाणी, तर वळद उंबरगाव येथे चोरीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणखी दहशतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही संशयित तरुणांकडे धारदार हत्यारे असल्याचे दिसून आले. तसेच ड्रोनच्या सहाय्याने परिसरात हालचाली सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती वाढली आहे. या संशयितांचा नेमका उद्देश काय, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
परिसरात वाढत्या संशयास्पद हालचालींमुळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिस प्रशासनाने तात्काळ गस्त वाढवून ड्रोनसह फिरणाऱ्या संशयितांचा शोध घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS