केज: केज तहसील कार्यालयासमोर अर्चनाताई पिंटू मोरे यांचे सोमवारपासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तसेच हारुणभाई इन

केज: केज तहसील कार्यालयासमोर अर्चनाताई पिंटू मोरे यांचे सोमवारपासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तसेच हारुणभाई इनामदार आणि सीताताई बनसोड यांच्या मध्यस्थीने अखेर तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले आहे.
उपोषणाच्या ठिकाणी नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या अर्चनाताई मोरे व त्यांच्या कुटुंबासमवेत चर्चा केली. त्यानंतर केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख यांच्याशी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती करण्यात आल्यानंतर, पोलीस प्रशासनाच्या लेखी व तोंडी आश्वासनानंतर मोरे कुटुंबाने आपले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले.
काय आहे नेमके प्रकरण?
शासकीय विश्रामगृहाच्या शेजारील बीड रोडवर ‘जय भवानी मंडप सेवा केंद्र अँड डेकोरेशन’ हे दुकान अर्चनाताई मोरे यांचे पती पिंटू मोरे व मुलगा शुभम उर्फ राम मोरे चालवतात. एप्रिल महिन्यात अर्चना मोरे यांचा भाऊ आरोपी गोविंद किसनराव कोंबडे याने सदर दुकानाला आग लावली होती. या आगीत रोख रकमेसह मंडप साहित्य आणि शेजारील कृषी दुकान व मेडिकलचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १८७/२०२६) दाखल आहे.
या गुन्ह्यातील तपासी अधिकारी राजू वाघमारे व आरोपी गोविंद कोंबडे हे शहरातील एका बीअर बारमध्ये एकत्र मद्यपान करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तसेच आरोपीकडून मोरे कुटुंबाला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असूनही पोलीस प्रशासन आरोपीशी संगनमत करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत न्याय मिळण्यासाठी अर्चनाताई मोरे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
- बीअर बारमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तपासी अधिकारी राजू वाघमारे यांना तात्काळ निलंबित व सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी गोविंद कोंबडे याला बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे.
- आरोपी, त्याची पत्नी व तपासी अधिकारी वाघमारे यांचे ‘कॉल डिटेल्स’ (CDR) तपासण्यात यावेत.
- मोरे कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
हे प्रकरण गंभीर असल्याने नेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सीताताई बनसोड आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख व पोलीस अंमलदार शिवाजी कागदे यांनी उपोषणकर्त्यांना नारळपाणी देऊन व लेखी आश्वासन पत्र सोपवून उपोषण सोडवले.
यावेळी नगरसेविका सौ. पद्मिनी अक्का शिंदे, युवा नेते विकी लोखंडे, पत्रकार तात्या गवळी, विवेक बनसोड, युवा नेते बबलू साखरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

COMMENTS