बीड - देवगिरी प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली 17 वी राज्यस्तरीय शालेय व म

बीड – देवगिरी प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली 17 वी राज्यस्तरीय शालेय व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा शनिवारी (दि. 8) बीड येथील ’तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे 165 स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या प्रभावी वक्तृत्वातून साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना उजाळा दिला.
स्पर्धेचे उद्घाटन बलभीम महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. मनोहर सिरसाट यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने समाजाला एकोपा, समता आणि परिवर्तनाचा विचार दिला. त्यांच्या साहित्यामुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध व व्यापक झाले, तसेच दलित साहित्य चळवळीला प्रेरणा मिळाली. अण्णाभाऊंच्या मानवतावादी विचारांना कृतीची जोड देण्याची गरज असून, वक्तृत्वातून मांडलेले विचार केवळ भाषणापुरते न ठेवता ते समाजमनात रुजविण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘मी भारतीय आहे’ ही भावना सर्वप्रथम आणि सर्वांत महत्त्वाची असल्याचे सांगत धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मतेची जपणूक करण्याचे आवाहन केले. गेल्या 16 वर्षांपासून ही वक्तृत्व स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असल्याचे नमूद करत त्यांनी युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेची कास धरावी, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे आणि बदलत्या काळानुसार ज्ञान व कौशल्ये अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन केले.
यावेळी ड. सतीष शिंदे, उत्तम पवार, प्रा. राम गायकवाड आणि प्रा. डॉ. उत्तम साळवे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा घेऊन ते समाजजीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.
ही स्पर्धा वरिष्ठ (पदवी/पदव्युत्तर) आणि कनिष्ठ (इयत्ता 8 वी ते 12 वी) अशा दोन गटांमध्ये पार पडली. स्पर्धेतील वरिष्ठ गटात कोल्हापूरचा संकेत पाटील याने प्रथम (10,000), मुंबईचा यश पाटील याने द्वितीय (7,000), तर इचलकरंजीचा सिद्धेश्वर मिसाळ याने तृतीय (5,000) क्रमांक पटकावला. तसेच कनिष्ठ गटात बीडचा ऋतुराज काकडे याने प्रथम (7,000), सोलापूरची प्रणाली धस हिने द्वितीय (5,000), तर बीडची स्वरा लोकरे हिने तृतीय (3,000) क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना रोख रक्कमेसह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, याशिवाय दोन्ही गटांतील प्रत्येकी तीन गुणवंत स्पर्धकांना प्रत्येकी 1,000 चे उत्तेजनार्थ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धेच्या मूल्यमापनाची जबाबदारी वरिष्ठ गटासाठी डॉ. बाळासाहेब कटारे, प्रा. शरद सदाफुले व डॉ. अशोक खेत्री, तर कनिष्ठ गटासाठी डॉ. नंदकुमार उघाडे, प्रा.बाळासाहेब जाधव व युवा व्याख्याते आदित्य ठोंबरे यांनी पार पाडली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रा. प्रदीप रोडे, प्रो. डॉ. मनोहर शिरसाट, प्रा. राम गायकवाड, प्रो. डॉ. प्रेमचंद सिरसट, प्रा. शरद वंजारे, प्रा. अर्जुन राठोड आदी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. जी. निकाळजे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. योगिता लांडगे यांनी केले, तर आभार प्रा. किशोर वाघमारे यांनी मानले. देवगिरी प्रतिष्ठानतर्फे सर्व स्पर्धक, शिक्षक व पालकांसाठी भोजन व अल्पोपहाराची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमास तुलसी समूहातील विविध शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS