नांदेड: नांदेड शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या डॉक्टर लेन परिसराला जोडणार्या दधीची उड्डाणपुल मार्गावर अवैधरीत्या उभ्या करण्यात येणार्या ॲम्बुलन्स व

नांदेड: नांदेड शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या डॉक्टर लेन परिसराला जोडणार्या दधीची उड्डाणपुल मार्गावर अवैधरीत्या उभ्या करण्यात येणार्या ॲम्बुलन्स वाहनांमुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रुग्णसेवेसाठी असलेली ही वाहनेच आता नागरिकांसाठी अडथळा ठरत असून, अर्धा किलोमीटरपर्यंत एका बाजूला लागलेल्या ॲम्बुलन्सच्या रांगेमुळे वाहनचालकांना अक्षरशः वाट काढत प्रवास करावा लागत आहे. या मार्गालगत अनेक खासगी रुग्णालये असल्याने विविध रुग्णालयांच्या ॲम्बुलन्स दिवसभर रस्त्याच्या कडेला पार्क केल्या जातात. काही वाहनचालकांनी सार्वजनिक रस्ताच कायमस्वरूपी पार्किंगसाठी वापरण्यास सुरुवात केल्याने रस्त्याची रुंदी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. परिणामी समोरून येणार्या वाहनांना मार्ग देताना वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना बसत आहे. पादचार्यांसाठी सुरक्षित जागाच उरली नसल्याने अनेकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल किंवा अन्य आपत्कालीन सेवांची वाहने अडकल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, वाहतूक पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. नो-पार्किंग नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रभावी कारवाई होत नसल्याने अवैध पार्किंगला जणू प्रशासनाचे अभय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, रुग्णालयांसाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स पार्किंगची व्यवस्था करणे, नो-पार्किंग क्षेत्रात नियमित दंडात्मक कारवाई करणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथक तैनात करणे ही काळाची गरज आहे. शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या दधीची उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

COMMENTS