अकोले : अकोल्याची भूमी असामान्य असून दक्षिण भारतातील पहिला आश्रम याच ठिकाणी स्थापन झाला. प्रभू श्रीरामांना शस्त्रसामग्री दाखविणे, रावणवधासाठी बाण

अकोले : अकोल्याची भूमी असामान्य असून दक्षिण भारतातील पहिला आश्रम याच ठिकाणी स्थापन झाला. प्रभू श्रीरामांना शस्त्रसामग्री दाखविणे, रावणवधासाठी बाण प्रदान करणे आणि राक्षसांच्या विनाशाच्या कार्यात या आश्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन श्रीराम मंदिर न्यास (अयोध्या) येथील कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी केले. अकोले येथील अगस्ती आश्रमात पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त आयोजित महिनाभराच्या अखंड कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.
यावेळी आमदार किरण लहामटे, अगस्ती देवस्थान न्यासाचे अध्यक्ष के. डी. धुमाळ, प्राचार्य अनिल सहस्रबुद्धे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हा कार्यवाह दीपक जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, भारत हे धर्माधिष्ठित राष्ट्र असून सनातन धर्म हा त्याचा पाया आहे. अगस्ती महाराज आणि माता लोपमुद्रा यांनी अकोल्यात वास्तव्य केल्यामुळे ही भूमी अधिक पवित्र ठरली आहे. प्रभू श्रीरामांना विजयी करणारे ‘आदित्य स्तोत्र’ही अगस्ती महाराजांनीच निर्मिले आहे. अमृतवाहिनी प्रवरा नदीचे पाणी शुद्ध व औषधी गुणांचे असून ‘गोदावरी स्नान आणि प्रवरा पान’ या म्हणीवरून तिचे महत्त्व अधोरेखित होते.
याप्रसंगी आमदार किरण लहामटे यांनी, मनाच्या शांततेसाठी आपण नियमित अगस्ती आश्रमात येत असल्याचे सांगत देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. देवस्थानचे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी प्रभू श्रीराम मार्गिकेमध्ये अगस्ती देवस्थानाचा समावेश करण्याची मागणी केली. अयोध्येतील श्रीराम मंदिरात स्थापित केलेली अगस्ती महाराजांची मूर्ती ही अकोले येथील मूर्तीच्या धर्तीवर साकारण्यात आली असून हा अकोलेकरांसाठी गौरवाचा क्षण असल्याचे मत दीपक महाराज देशमुख यांनी व्यक्त केले.

COMMENTS