मांडवी: आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूल, मांडवी येथे विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरा, अध्यात्म, सामाजिक ऐक्य आणि संस्कारांची
मांडवी: आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूल, मांडवी येथे विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरा, अध्यात्म, सामाजिक ऐक्य आणि संस्कारांची जोपासना व्हावी या उद्देशाने ज्ञानदिंडी व प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या जयघोषात आणि संतांच्या अभंगांनी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचे महत्त्व समजावे तसेच भक्त पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षण आणि क्रीडा यांसोबतच अध्यात्मिक व नैतिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, यासाठी शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले.
शाळेच्या शिक्षिका छाया भोयर, शशिकला कंधारे, सुनीता जाधव आणि कविता उंबरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानदिंडीत विद्यार्थ्यांनी वारकर्यांची व संतांची वेशभूषा परिधान केली होती. भगवे ध्वज, टाळ-मृदुंग, अभंग आणि विठ्ठल नामस्मरणाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली. यामुळे ग्रामस्थांनाही आषाढी एकादशीचा उत्साह अनुभवता आला.
दिंडीदरम्यान पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणांद्वारे वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्यंकट इंगळे यांच्यासह शिक्षक सचिन चव्हाण, नागेश गेडाम, देविदास पवार, आकाश राठोड, सुभाष चव्हाण, शशिकांत कांबळे, प्रतीक गवळी, तांदूळकर सर, जाधव सर, संजय राठोड तसेच शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS