मुंबई : राज्यातील शेतकर्यांना थेट विक्रीची संधी मिळावी आणि ग्राहकांना ताजा, दर्जेदार शेतमाल सहज उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्

मुंबई : राज्यातील शेतकर्यांना थेट विक्रीची संधी मिळावी आणि ग्राहकांना ताजा, दर्जेदार शेतमाल सहज उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख महामार्ग व रस्त्यांवरील टोल नाक्यांच्या परिसरात सुसज्ज ‘कृषी मॉल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट दुवा अधिक मजबूत होणार आहे.
राज्यातील अनेक शेतकर्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी दूरच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागते. यासाठी मोठा वाहतूक खर्च, वेळ आणि श्रम खर्ची पडतात. अनेकदा माल वेळेत बाजारात न पोहोचल्याने किंवा साठवणुकीच्या अडचणींमुळे नुकसानही होते. या पार्श्वभूमीवर टोल नाक्यांवरच विक्रीची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय शेतकर्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. शेताच्या जवळच विक्री केंद्र मिळाल्याने वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या कृषी मॉलमध्ये फळे, भाजीपाला, धान्य तसेच इतर शेतमाल थेट शेतकर्यांकडून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होऊन शेतकर्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळेल. तसेच ग्राहकांनाही बाजारपेठेच्या तुलनेत ताज्या मालाची खरेदी स्वस्त दरात करता येईल. महामार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे, कारण प्रवासादरम्यान दर्जेदार शेतमाल सहज उपलब्ध होईल. यापूर्वी राज्यात ‘शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित आठवडी बाजार यशस्वी ठरले होते. या अनुभवाच्या आधारे आता टोल नाक्यांवर कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी होऊन शेतकर्यांना स्थिर व विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होईल.
शेतकर्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळणार चालना
सार्वजनिक बांधकाम विभागाने या मॉलच्या उभारणीसाठी प्राथमिक नियोजन सुरू केले असून, आवश्यक जागा, सुविधा आणि व्यवस्थापन यावर काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने राज्यभर ही योजना राबविण्यात येणार असून, प्रत्येक टोल नाक्यावर शेतमाल विक्रीसाठी सुसज्ज व्यवस्था उभारण्याचा मानस आहे. एकूणच, या निर्णयामुळे शेतकर्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असून ग्राहकांनाही स्वस्त आणि ताजा शेतमाल मिळणार आहे. त्यामुळे या उपक्रमाकडे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

COMMENTS