फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा विभागीय प्रदेशाध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांचे राज्य सरकारला आवाहनराज्य सरकारने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्य

फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा विभागीय प्रदेशाध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांचे राज्य सरकारला आवाहनराज्य सरकारने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याबरोबरच समाजातील गरीब, गरजवंत, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, विधवा माता, दिव्यांग आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठीही ठोस व सर्वसमावेशक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, सुरक्षा व आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ठराव मंजूर करून लाखो ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन फेस्कॉमचे उत्तर मराठवाडा विभागीय प्रदेशाध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केले आहे.डॉ. वैद्य यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या अनेक योजना विशिष्ट घटकांसाठी राबवल्या जात असल्या तरी आयुष्यभर कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देणार्या ज्येष्ठ नागरिकांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्येष्ठत्व हा कोणताही गुन्हा नसून तो जीवनातील अनुभव, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा केवळ राज्याचा नव्हे, तर संपूर्ण देशाच्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा सन्मान आहे. आज अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक असुरक्षितता, वाढते आरोग्य खर्च, एकाकीपणा आणि सामाजिक उपेक्षा यांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने मासिक सन्मानभत्ता वाढविणे, सर्व ज्येष्ठांना मोफत किंवा सवलतीच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, औषधोपचारासाठी विशेष निधी, सार्वजनिक वाहतुकीत अधिक सवलती, ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रांची उभारणी आणि कायदेशीर संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. वैद्य म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाचा विकास महत्त्वाचा असला तरी गोरगरीब, कष्टकरी आणि आयुष्यभर समाजासाठी झटलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम सरकारने करावे. त्यांच्या जीवनाला आधार देणारे निर्णय घेतल्यास ते केवळ कल्याणकारी ठरणार नाहीत, तर राज्याच्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरतील. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प करावा. लाखो ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा माता आणि वंचित घटकांच्या हिताचे निर्णय घेतल्यास त्यांचे आशीर्वाद सरकारला निश्चितच लाभतील. सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानाने दिलेल्या प्रतिष्ठेच्या अधिकाराला न्याय देण्यासाठी हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही डॉ. हंसराज वैद्य यांनी व्यक्त केला.

COMMENTS