नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या एकसंघतेचा निर्णायक संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदे

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या एकसंघतेचा निर्णायक संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यानंतर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना महायुतीचा एकमुखी पाठिंबा राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच ही जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी मागणी केली होती. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने राज्यातील सर्व 17 जागांचे वाटप करताना नांदेडची जागा भाजपला देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय अंतिम करण्यात आला. पक्षासाठी जागा मागणे आणि आपली भूमिका मांडणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असला तरी अंतिम निर्णय नेतृत्वाचा असतो. महायुतीच्या धर्माचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अर्ज मागे घेतला जात आहे, असे प्रतापराव चिखलीकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 84 सदस्य तसेच पक्षाशी संबंधित इतर लोकप्रतिनिधी आणि अपक्ष सदस्य अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही अटी-शर्ती अथवा राजकीय सौदेबाजीच्या आधारे हा निर्णय घेतलेला नसून नेतृत्वाच्या सूचनेचा सन्मान म्हणून हा निर्णय स्वीकारल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिका आणि नगरपालिकांमधील निवडणुकांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षनिहाय धोरणे वेगळी असू शकतात. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. आगामी जिल्हा परिषद, मध्यवर्ती बँक किंवा इतर राजकीय समीकरणांबाबत कोणतीही पूर्वअट किंवा चर्चा झालेली नसल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षांनाही ही निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील राजकीय वातावरण सकारात्मक राहावे, यासाठी सर्वांनी विधायक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने राज्यभरातील विधान परिषद निवडणुकांसाठी केलेल्या जागावाटपाच्या निर्णयाची जिल्हा पातळीवर प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी सर्व घटक पक्षांनी एकदिलाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, 31 मे रोजी सायंकाळी जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत अनेक इच्छुकांनी आपापली नामांकनपत्रे दाखल केली होती. त्यामध्ये कोणतीही विसंगती नव्हती. मात्र महायुतीच्या नेतृत्वाने राज्यातील 17 जागांपैकी 11 भाजपला, 4 शिवसेनेला आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व घटक पक्षांनी त्या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित होते. अमरनाथ राजूरकर हे सुरुवातीपासूनच महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. जागावाटपाच्या अंतिम घोषणेनंतर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाने हा निर्णय स्पष्ट केला आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज प्रतापराव चिखलीकर यांनी प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करताना चव्हाण म्हणाले की, राज्यभरात कुठेही दगाफटका होणार नाही याची खबरदारी वरिष्ठ नेतृत्व घेत आहे. प्रत्येक जिल्ह्यात महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. संवादाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, राजकारणात मतभेद, अपेक्षा आणि मागण्या असतात; मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी संवाद हाच सर्वोत्तम पर्याय असतो. जिल्ह्यातील प्रश्न असोत किंवा राजकीय मतभेद, डायलॉगच्या माध्यमातून त्यांचे निराकरण होऊ शकते. महायुती अधिक मजबूत व्हावी, हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अपक्ष उमेदवारांनाही माघार घेण्याचे आवाहन करताना त्यांनी मतांचे विभाजन टाळण्याची गरज व्यक्त केली. स्थानिक राजकारणातील विविध चर्चांना फारसे महत्त्व न देता अंतिम निकाल महायुतीस पोषक राहणे हेच सर्व पक्षांचे समान उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. महायुतीतील घटक पक्षांमध्ये सातत्याने संवाद सुरू असून भविष्यातही तो कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत चव्हाण यांनी नांदेडमध्ये महायुतीची एकजूट अधिक दृढ झाल्याचा दावा केला.

COMMENTS