Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘पीएमआरडीए’ हद्दीत हक्काच्या घरांसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’!महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे प्रशासनाला निर्देश; 674 गावांतील लाभार्थ्यांना दिलासा

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील 674 गावांमधील ‘पंतप्रधान आवास योजने’ला गती देण्यासाठी पीएमआरडीएने विशेष ‘अ‍ॅक

पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, तापमानात घट
भोंदू ऋषीकेश वैद्य महिला अत्याचारप्रकरणी अटकेत
कुकडी डावा कालवा नूतनीकरणासाठी 47 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील 674 गावांमधील ‘पंतप्रधान आवास योजने’ला गती देण्यासाठी पीएमआरडीएने विशेष ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. केवळ अर्ज मागवून न थांबता, सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्याचे सक्त निर्देश महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. यामुळे पीएमआरडीए हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा झाला आहे.
अभियांत्रिकी विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. अभिजित चौधरी बोलत होते. या वेळी प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी आणि अंमलबजावणीला वेग देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. योजनेच्या अंमलबजावणीत येणार्‍या तांत्रिक अडचणी वेळेत सोडवण्यासाठी ‘शहरस्तरीय तांत्रिक कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञांची पदे तातडीने भरण्याच्या सूचना महानगर आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच, ‘लाभार्थी आधारित बांधकाम’ आणि ‘भागीदारीतून परवडणारी घरे’ या दोन प्रमुख घटकांसाठी अनुभवी व तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या दर्जासोबतच कामाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परवडणार्‍या घरांसाठी जमिनीची उपलब्धता हा मोठा अडथळा ठरतो. यावर उपाय म्हणून पीएमआरडीए हद्दीतील नऊ तालुक्यांमध्ये मोक्याच्या शासकीय जागांचा शोध घेण्याची मोहीम राबवली जाणार आहे. या जागांवर ‘एएचपी’ घटकांतर्गत गृहप्रकल्प उभारण्याच्या शक्यतेची पडताळणी केली जाईल. शक्यतो प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक तरी प्रकल्प उभारण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून केले जात आहे.


गावठाणांमधील प्रस्तावांना बळ
‘पंतप्रधान आवास योजना- 2’ अंतर्गत गावठाण भागातील प्रस्तावांनाही मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत महानगर आयुक्तांनी दिले आहेत. ग्रामीण व निमशहरी भागातील वाढती लोकसंख्या आणि जागेची टंचाई पाहता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे प्रलंबित प्रस्तावांना गती मिळणार असून, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.

COMMENTS