नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे स्वीडनचे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेत विवि

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे स्वीडनचे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर विचारविनिमय केला. या बैठकीत स्वीडनच्या युवराज्ञी व्हिक्टोरिया यांनीही सहभाग घेतला. त्यांनी स्वीडनचे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ आणि राणी सिल्व्हिया यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राजांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.
दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत-स्वीडन संबंधांचा सर्वांगीण आढावा घेत व्यापार, गुंतवणूक, नवकल्पना, हरित परिवर्तन, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण, सुरक्षा, डिजिटल व्यवस्था, लघु व मध्यम उद्योग, अंतराळ संशोधन, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांतील सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले. लोकशाही मूल्ये, संशोधन, शाश्वत विकास आणि नवकल्पनांवर आधारित असलेले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत भारत-स्वीडन संबंधांना ‘धोरणात्मक भागीदारी’च्या नव्या पातळीवर नेण्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. ही भागीदारी सुरक्षा आणि स्थैर्यावरील धोरणात्मक संवाद, पुढील पिढीची आर्थिक भागीदारी, नवतंत्रज्ञान आणि विश्वासार्ह संपर्क व्यवस्था तसेच लोक, पर्यावरण, आरोग्य आणि लवचिकता या चार प्रमुख आधारस्तंभांवर उभारण्यात येणार आहे. या भागीदारीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांनी ‘भारत-स्वीडन संयुक्त कृती आराखडा 2026 ते 2030’ स्वीकारला. या आराखड्याद्वारे राजकीय, आर्थिक, तांत्रिक, सुरक्षा, हवामान बदल तसेच जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी व्यापक दिशा निश्चित करण्यात आली आहे. भारत आणि युरोपीय संघ यांच्यात नुकत्याच पूर्ण झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे आर्थिक आणि व्यापारी संबंधांना नवे बळ मिळेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. या कराराची लवकर अंमलबजावणी व्हावी आणि व्यापार, गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान सहकार्य अधिक मजबूत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यावरही सहमती झाली.
पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन, शाश्वत वाहतूक व्यवस्था आणि डिजिटल परिवर्तन या क्षेत्रांमध्ये स्वीडनकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याचे कौतुक केले. त्याचवेळी पंतप्रधान क्रिस्टरसन यांनी भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल परिवर्तन क्षेत्रात साधलेल्या प्रगतीचे विशेष अभिनंदन केले. स्वीडनच्या अर्थव्यवस्थेत भारतीय समुदायाचे योगदानही त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS