कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय संघर्ष पेटला असून, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि नगराध्य


कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या राजकारणात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय संघर्ष पेटला असून, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि नगराध्यक्षा रोहिणी गुंड व उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्यात थेट संघर्ष उभा ठाकला आहे. शहरातील टपरीधारक, इतर व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांवरील कारवाईवरून सत्ताधाऱ्यांमध्येच जोरदार मतभेद समोर आले आहेत.
कर्जत शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोरगरीब टपरीधारक आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणावरून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि नगराध्यक्षा रोहिणी गुंड व उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्यात थेट संघर्ष पेटला आहे. गरिबांचे संसार उघड्यावर पाडणार नाही, अशी ठाम भूमिका घेत नगराध्यक्षांनी सभापती राम शिंदे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अशी माहिती पत्रकारांना शनिवारी दिली.
या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना नगराध्यक्ष रोहिणी गुंड व उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांनी सांगितले की, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कर्जत शहरातील मेन रोड, कुळधरण रोड, गवडो गल्ली, बाजार तळ आणि जुनी पंचायत समिती रोड येथील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ऐन महागाईच्या काळात हातावर पोट असणाऱ्या गरिबांना रस्त्यावर आणणे चुकीचे आहे. अनेक वर्षांपासून हे सर्व व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी स्थानिक रहिवाशांची घरे आहेत. यामुळे आम्ही कारवाईला स्पष्ट नकार दिला.
आणि विरोध केल्यामुळे संतापलेल्या राम शिंदे यांनी राजकीय अस्त्र उपसले आहे. स्वतःच्या गटाचे आणि आमदार रोहित पवारांच्या गटाचे मिळून एकूण १३ नगरसेवकांना हाताशी धरून आमच्यावर ‘अविश्वास ठराव’ दाखल केला आहे. असे सांगून गुंड व मेहेत्रे यांनी पुढे सांगितले की, धक्कादायक बाब म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच, राम शिंदे यांनी फोन करून दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला.
‘पद गेले तरी चालेल, पण गरिबांचा संसार वाचवणार!’ या संपूर्ण संघर्षात नगराध्यक्षा रोहिणी गुंड, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे आणि बांधकाम सभापती भास्कर भैलुमे व नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी अत्यंत आक्रमक आणि स्वाभिमानी भूमिका घेतली आहे.

COMMENTS