Homeताज्या बातम्यादेश

बांगलादेशात पुन्हा एका हिंदू तरूणाची हत्या

ढाका : बांगलादेशात अल्पसंख्याक, विशेषतः हिंदू समाजावर होणार्‍या हल्ल्यांची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी रात्री आणखी एका हि

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन
बांगलादेशातील सत्तांतर आणि भारतासाठी नवे समीकरण
भारतासोबत संबंध सुधारण्याचे बीएनपीचे संकेत

ढाका : बांगलादेशात अल्पसंख्याक, विशेषतः हिंदू समाजावर होणार्‍या हल्ल्यांची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी रात्री आणखी एका हिंदू नागरिकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने देशातील कायदा-सुव्यवस्थेवर आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या 24 तासांत घडलेली ही दुसरी हत्या असल्याने चिंता अधिकच गडद झाली आहे.
राजधानी ढाक्यालगतच्या नरसिंगदी जिल्ह्यात सोमवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास 40 वर्षीय शरत चक्रवर्ती मणी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. शरत हे चारसिंदूर बाजारात किराणा दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे ते दुकानात उपस्थित असतानाच काही अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शरत चक्रवर्ती मणी हे काही वर्षांपूर्वी दक्षिण कोरियामध्ये काम करत होते. मायदेशी परतल्यानंतर त्यांनी छोटा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, त्यांच्या जीवनाचा असा अंत होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हिंदू समाजात असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. ही घटना एकटी नाही. याच महिन्यात 3 जानेवारी रोजी खोकन चंद्र दास या 50 वर्षीय हिंदू नागरिकावर अत्यंत अमानुष हल्ला करण्यात आला. त्यांना मारहाण करून धारदार शस्त्रांनी जखमी करण्यात आले आणि नंतर जिवंत जाळण्यात आले. या घटनेने मानवतेलाच काळीमा फासला होता. त्याआधी 24 डिसेंबर रोजी राजबाडी जिल्ह्यातील पांग्शा उपजिल्ह्यात अमृत मंडल या हिंदू नागरिकाची कथित खंडणीच्या आरोपाखाली मारहाण करून हत्या करण्यात आली. तसेच 18 डिसेंबर रोजी मैमनसिंह शहरात दीपू चंद्र दास या 25 वर्षीय युवकाला कथित ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने ठार मारले आणि मृतदेह पेटवून दिला. हिंसाचार केवळ हत्या इथपर्यंत मर्यादित नाही. 23 डिसेंबर रोजी चटगावजवळील राउजान परिसरात कतारमध्ये काम करणार्‍या शुख शिल आणि अनिल शिल यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी जाळपोळ केली. सुदैवाने घरातील सर्व सदस्य बचावले, मात्र या घटनेने अल्पसंख्याकांवरील दबाव स्पष्टपणे अधोरेखित केला. बांगलादेशात सातत्याने घडणार्‍या या घटनांमुळे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणांकडून ठोस पावले उचलली जात नसल्यास, ही हिंसाचाराची मालिका अधिकच भयावह रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मानवी हक्क संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या गंभीर परिस्थितीकडे वेधले जाणे आता अपरिहार्य ठरत आहे.

COMMENTS