Homeताज्या बातम्या

कोटग्याळ-माचनूर पुलावरून पाण्याचा वेग वाढला; माचनूर-कुंडलवाडी मार्गावरील वाहतूक बंद

कुंडलवाडी: गेल्या दोन दिवसांपासून कुंडलवाडी शहरासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे कोटग्याळ-म

देवशयनी आषाढी एकादशी: किनवट परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमला; मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी
खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी; नाशिक मनपात शिंदे अन् ठाकरे गट आमनेसामने, जोरदार हायव्होल्टेज ड्रामा!
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ रविवारी बीडमध्ये कॅन्डल मार्च; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

कुंडलवाडी: गेल्या दोन दिवसांपासून कुंडलवाडी शहरासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे कोटग्याळ-माचनूर गावादरम्यान असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून, गुरुवारी (दि. ३० जुलै) सकाळी ११ वाजल्यापासून माचनूर-कुंडलवाडी मार्गावरील वाहतूक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली आहे. त्यामुळे माचनूर व कुंडलवाडीदरम्यानचा संपर्क तात्पुरता खंडित झाला असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक रोखण्यात आली आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणार्‍या नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

दरम्‍यान, सततच्या पावसामुळे परिसरातील लहान-मोठे ओढे, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत असला, तरी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. कोटग्याळ-माचनूर पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नागरिकांनी व वाहनचालकांनी जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कोटग्याळचे पोलीस पाटील साहेबराव डोंगरे यांनी केले आहे.

COMMENTS