किनवट: निसर्गाच्या प्रकोपाने आणि धोधो कोसळणार्या मुसळधार पावसाने किनवट तालुक्यात हाहाकार माजवला असून नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. या पु

किनवट: निसर्गाच्या प्रकोपाने आणि धोधो कोसळणार्या मुसळधार पावसाने किनवट तालुक्यात हाहाकार माजवला असून नदी-नाल्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. या पुराच्या तुफानी प्रवाहात मौजे कंचली येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी बळी गेल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
कंचली ग्रामपंचायतीत सेवक म्हणून कार्यरत असलेले राजू रेड्डी दांडेलु हे बुधवारी (२९ जुलै) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कामानिमित्त रेवा नाईक तांड्याकडे निघाले होते. कंचली-आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून दुथडी भरून वाहणार्या पाण्याच्या प्रचंड वेगाचा अंदाज न आल्याने, काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि ते पाण्याच्या प्रबळ प्रवाहात वाहून गेले.
घटनेचे वृत्त वार्यासारखे पसरताच ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. स्थानिकांनी तातडीने धाव घेत शोधकार्य सुरू केले आणि पोलिसांना पाचारण केले. बातमी मिळताच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गावकर्यांच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबवली, परंतु अंधार आणि पुराचा वाढता जोर यामुळे निसर्गाने मानवी प्रयत्नांना दाद दिली नाही.
दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी महसूल प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली. तहसीलदार सौ. शारदा चौंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी बालाजी पुष्पलवार, ग्राममहसूल अधिकारी हंबर्डे, कोतवाल संतोष बिल्ललवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पावसाची सतत पडणारी संततधार आणि पुराचा उफाळता वेग शोधाच्या प्रत्येक पावलावर अडथळे निर्माण करत आहे. प्रशासनाने आता विशेष शोध पथकाला पाचारण करून ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. घटनेला २४ तासांचा कालावधी उलटूनही राजू यांचा देह हाती लागलेला नाही; ज्यामुळे कंचलीसह संपूर्ण परिसरात गहिरे दुःखाचे सावट पसरले आहे.
या पुरामुळे आंदबोरी, पांगरपहाड, अप्पारावपेठ आणि रेवा नाईक तांडा या गावांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिक निसर्गाच्या आणि प्रशासनाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. अप्पारावपेठ व कंचली मार्गावरील कमी उंचीचे पूल दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. वारंवार विनंत्या आणि निवेदने देऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे कायम डोळेझाक केली, असा संतप्त आरोप ग्रामस्थ करत आहेत. एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्यानंतर आतातरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित करत भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी या नाल्यावर उंच व सुरक्षित पूल उभारण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

COMMENTS