Homeताज्या बातम्या

देशभरात DRI ची मोठी कारवाई: २७ किलोहून अधिक तस्करीचे सोने जप्त; १२ जणांना अटक

नवी दिल्ली: सोन्याच्या तस्करीविरोधातील कारवाईला आणखी धार देत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात विविध ठिकाणी एकाच वेळी विशेष मोहीम राबवली

अण्णा हजारे विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी मैदानात; अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलनाला सुरुवात
आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
उपवर्गीकरणाविरोधातील लढा तीव्र; पनवेल ते चेंबूर ‘आरक्षण उपवर्गीकरणाची अंत्ययात्रा’

नवी दिल्ली: सोन्याच्या तस्करीविरोधातील कारवाईला आणखी धार देत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात विविध ठिकाणी एकाच वेळी विशेष मोहीम राबवली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये तस्क्रीद्वारे भारतात आणलेले २७ किलोहून अधिक परदेशी सोने जप्त करण्यात आले असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान विमानातील शौचालय, वाहनांतील गुप्त कप्पे, भांड्यांमध्ये केलेली लपवणूक तसेच शरीरात सोने लपवून तस्करी करण्याच्या नवनव्या पद्धती उघडकीस आल्या आहेत.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे २३ आणि २४ जुलै रोजी अदीस अबाबाहून आलेल्या तीन प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी विमानाच्या मागील शौचालयाच्या छतामध्ये लपवून ठेवलेल्या सुमारे १२ किलो वजनाच्या सहा सोन्याच्या लगड्या सापडल्या. विमानतळावरील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सोने नंतर बाहेर काढण्याचा कट असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. संबंधित सोने जप्त करण्यात आले असून तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

याच काळात मिळालेल्या दुसऱ्या गुप्त माहितीनुसार उत्तर प्रदेशात ब्रह्मपुत्रा मेलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची तपासणी करण्यात आली. तिच्या कमरेच्या पट्ट्यात आणि हातातील पिशवीतून सुमारे पाच किलो वजनाच्या ४२ सोन्याच्या लगड्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक चौकशीत हे सोने बांगलादेशमार्गे भारतात आणल्याची कबुली संबंधित महिलेने दिली. त्यानंतर सोने जप्त करून तिलाही अटक करण्यात आली.

मुंबई विमानतळावर २२ आणि २३ जुलैदरम्यान झालेल्या दुसऱ्या एका कारवाईत तस्करांची अत्यंत वेगळी पद्धत समोर आली. विमानाच्या शौचालयात मेणामध्ये मिसळून सोन्याची भुकटी लपवली जात होती. सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती बाहेर काढून पुढे तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले. या कारवाईत ३.७ किलो सोने जप्त करण्यात आले असून मुख्य वाहक, सफाई कर्मचारी, संपर्क साधणारा मध्यस्थ आणि खरेदीदार अशा पाच जणांना अटक करण्यात आली.

१९ आणि २० जुलै रोजी कोलकाता रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाकडून ४.६ किलो परदेशी सोने जप्त करण्यात आले. हे सोने खास तयार केलेल्या भांड्यांमध्ये लपवून नेले जात होते. चौकशीत ते म्यानमारमार्गे भारतात आणल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात संबंधित प्रवाशालाही अटक करण्यात आली आहे.

याशिवाय, गेल्या आठवड्यात कोची आणि गुवाहाटी येथे झालेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये सुमारे दोन किलो सोने जप्त करण्यात आले. कोची विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाने शरीरात लपवून आणलेले सोने हस्तगत करण्यात आले, तर गुवाहाटीमध्ये एका मोटारमध्ये विशेष गुप्त कप्पा तयार करून ठेवलेली सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. या दोन्ही कारवायांमध्ये आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS