Homeताज्या बातम्या

’आयाराम-गयाराम’ वादावर काँग्रेसमध्ये खळबळ; रेहाना चिश्तींसमोर कार्यकर्त्यांचा संताप!

नांदेड: काँग्रेसच्या संघटनात्मक नियुक्त्यांवरून नांदेड जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी

भोकरात भरदिवसा स्कुटीची डिकी फोडून 1.60 लाखांची रोकड लंपासबँकेतून पैसे काढल्यानंतर काही मिनिटांतच चोरट्याचा डाव; पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
नांदेड जिल्ह्यातही ‘कोचिंग संस्कृती’चा वाढता प्रभाव; महाविद्यालयांतील उपस्थिती घसरली!
विना अटी सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड: काँग्रेसच्या संघटनात्मक नियुक्त्यांवरून नांदेड जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय सचिव तथा महाराष्ट्राच्या प्रभारी रेहाना चिश्ती यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी थेट आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षासाठी सातत्याने काम करणार्‍या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून पक्ष सोडून पुन्हा आलेल्या आयाराम-गयाराम नेत्यांना महत्त्वाची पदे दिली जात असल्याचा आरोप अनेकांनी केला.

काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीत मतदार याद्यांच्या पुनरीक्षण मोहिमेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, संघटनात्मक नियुक्त्यांचा मुद्दाच बैठकीत अधिक चर्चेचा विषय ठरल्याचे सांगितले जाते. काही पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या सृजन अभियानानंतर करण्यात आलेल्या नियुक्त्यांवर तीव्र आक्षेप नोंदवून, याबाबत पक्षश्रेष्ठींकडे आधीच तक्रारी करण्यात आल्याचे चिश्ती यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी रेहाना चिश्ती यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत, कोणावर अन्याय झाला असल्यास त्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. पक्षासाठी सातत्याने कार्य करणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, जिल्हाध्यक्षांनी नुकतीच जाहीर केलेल्या कार्यकारिणीत अनेक जुन्या पदाधिकार्‍यांना स्थान न मिळाल्याने असंतोष आणखी वाढल्याचे दिसून आले. काही कार्यकर्त्यांनी सार्वजनिकरीत्या नाराजी व्यक्त करण्याऐवजी स्वतंत्रपणे भेटून आपली बाजू मांडण्याची विनंती केली. त्यानुसार विश्रामगृहातही काही पदाधिकार्‍यांनी रेहाना चिश्ती यांची स्वतंत्र भेट घेऊन संघटनात्मक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली.

विशेष म्हणजे, पक्षाच्या या महत्त्वाच्या बैठकीला विधानसभेतील पराभूत उमेदवार, काही तालुकाध्यक्ष तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी गैरहजर राहिल्याची बाबही चर्चेचा विषय ठरली. या अनुपस्थितीबद्दल रेहाना चिश्ती यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे. एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना, दुसरीकडे पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नियुक्त्यांवरील वाद उफाळून येत असल्याने नांदेड जिल्हा काँग्रेससमोर संघटनात्मक ऐक्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अखेर पक्षातील अंतर्गत संघर्ष किती दिवस सुरू राहणार आणि जिल्ह्यातील काँग्रेसची संघटनात्मक स्थिती नेमकी कधी सुधारणार? असा प्रश्न आता कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS