भोकर: तालुक्यातील वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये नीलगाय, रोही (रोयटी), रानडुक्कर व इतर जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक

भोकर: तालुक्यातील वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये नीलगाय, रोही (रोयटी), रानडुक्कर व इतर जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाच्या भरवशावर महागडी बियाणे खरेदी करून पेरणी केलेल्या शेतकर्यांच्या पिकांवर जंगली प्राण्यांच्या कळपांकडून अक्षरशः ताव मारला जात असून, अनेक ठिकाणी उगवती पिके उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.
नारवट, आमदारी, वागद, बचोटी कॅम्प, तातकळवाडी, झिंगारवाडी, पांडुर्णा आदी जंगलालगतच्या गावांतील शेतकर्यांचे सोयाबीन, तूर, मका, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती शेतकर्यांनी दिली. “अस्मानी संकटांशी झुंज देत असताना आता जंगली प्राण्यांचा वाढता उपद्रव आमच्या जगण्यावरच घाला घालत आहे. दिवस-रात्र पिकांचे रक्षण करूनही नुकसान टाळता येत नाही,” अशी व्यथा एका शेतकर्याने व्यक्त केली.
दरम्यान, शिताखंडी परिसरात वनविभागाकडून करण्यात आलेल्या टीसीएम (TCM) कामांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जंगली प्राणी शेतात प्रवेश करू नयेत म्हणून खोदण्यात आलेले संरक्षक नाले आज बहुतांश ठिकाणी भुईसपाट झाले असून, प्राणी सहजपणे ते ओलांडून शेतात प्रवेश करत आहेत. या कामांच्या दर्जाबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, त्यात अपेक्षित सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.
पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकरी रात्री शेतात झोपड्या उभारून रात्रभर जागरण करत आहेत. त्यामुळे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढला असून शेतकरी जीव मुठीत धरून शेतीचे रक्षण करत आहेत. शेतकर्यांनी वनविभागाने तातडीने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी तसेच वनक्षेत्रालगत कायमस्वरूपी संरक्षण व्यवस्था उभारावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात वनविभागाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, शेतकर्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज व्यक्त होत आहे.

COMMENTS