कोपरगाव: कोपरगाव व निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्

कोपरगाव: कोपरगाव व निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून संबंधित कामांना शासनस्तरावर मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पाणी समस्येच्या निराकरणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील मौजे हिंगणी, मंजुर, माहेगाव देशमुख, डाऊच, सडे, शिंगवे, पुणतांबा तसेच निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या लोखंडी फळ्या कालांतराने जीर्ण व निकामी झाल्यामुळे चालू हंगामात पुरेशा प्रमाणात पाणी साठविणे कठीण झाले होते. परिणामी या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या हजारो एकर शेतीसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन लोखंडी फळ्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संबंधित कामांना मंजुरी मिळाली आहे.
यासोबतच हिंगणी येथील बंधाऱ्याच्या फाउंडेशनमधून होत असलेली मोठ्या प्रमाणातील पाणीगळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, फुटलेले दगडी प्रूव्हज बदलून नवीन एस.एस. चॅनल प्रूव्हज बसविणे तसेच सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवर संरक्षण रेलिंग उभारण्याची मागणीही करण्यात आली होती. या कामांनाही प्राधान्याने गती देण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार शासनाच्या नियोजनानुसार १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत तातडीची दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार असून मोठ्या स्वरूपाची कामे ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या शक्य त्या ठिकाणी एलिप्टिकल मध्ये रूपांतरीत करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे कोपरगाव व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून शेती उत्पादनाला चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले हे यश भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बंधारा दुरुस्तीसाठी कोठे किती निधी?
- खेडलेझुंगे: १ कोटी ४० लाख रुपये
- वडगाव कानळद: १ कोटी २० लाख रुपये
- माहेगाव देशमुख: १ कोटी ४० लाख रुपये
- हिंगणी: १ कोटी १० लाख रुपये
- डाऊच: ९० लाख रुपये
- पुणतांबा: ५० लाख रुपये
- शिंगवे: ४५ लाख रुपये
- सडे: ३४ लाख रुपये(एकूण निधी: ७ कोटी २९ लाख रुपये)

COMMENTS