मुंबई: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरण

मुंबई: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (RVSF) उभारण्याबाबत तातडीने कारवाई करावी, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात जालना, तळोजा, धाराशिव, पालघर, भिवंडी, खालापूर आदी ठिकाणी वाहन स्क्रॅपिंग सुविधा उपलब्ध असली तरी मुंबई परिसरात अधिकृत केंद्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत अल्प आहे. मुंबईत सुमारे ५३ लाख वाहने असून त्यात सुमारे १५ लाख चारचाकी, ३० लाखांहून अधिक दुचाकी आणि ५ ते ६ लाख व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक वाहन घनता मुंबईत असून त्यामुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि रस्त्यांवरील ताण वाढल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

COMMENTS