नांदेड: नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलिस चौक्याच आज बेवारस, अस्वच्छ आणि मद्यपींच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याचे धक्क

नांदेड: नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलिस चौक्याच आज बेवारस, अस्वच्छ आणि मद्यपींच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याचे धक्कादायक वास्तव नांदेड शहरात समोर आले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळनगर पोलिस चौकी, तसेच विजयनगर आणि सांगवी पोलिस चौक्यांची अवस्था पाहिल्यानंतर पोलिस यंत्रणेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोकुळनगर पोलिस चौकीत प्रवेश करताच नागरिकांच्या स्वागताला पोलिस नव्हे, तर दुर्गंधी, कचर्याचे ढीग, रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे कप आणि घाणीचे साम्राज्य दिसून येते. चौकीचे दरवाजे उघडे असले तरी आत एकही पोलिस कर्मचारी नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांच्या तक्रारी ऐकणारे, कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून जाणारे पोलिसच अनुपस्थित असल्याने या चौक्यांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री राहिले आहे, अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
रात्रीच्या वेळी या चौकीच्या परिसरात मद्यपींची मैफल रंगत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दारूच्या बाटल्यांचा खच, सर्वत्र पसरलेली घाण आणि अस्वच्छतेमुळे हा परिसर असुरक्षित बनला आहे. विशेष म्हणजे गोकुळनगर हा शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने आणि दाट निवासी वस्ती असलेला परिसर आहे. अशा ठिकाणी पोलिस चौकीच निष्क्रिय असेल, तर महिलांनी, विद्यार्थ्यांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी आपत्कालीन प्रसंगी धाव घ्यायची तरी कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
विजयनगर पोलिस चौकीलाही कुलूप लटकलेले दिसले, तर सांगवी पोलिस चौकीतही एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या शासकीय इमारती धूळ, कचरा आणि दुर्लक्षाच्या हवाली झाल्या आहेत. शहरात गस्त, गुन्हेगारीविरोधी मोहीम आणि जनसंपर्काच्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात पोलिस चौक्यांची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या दाव्यांवरच प्रश्न उपस्थित करत आहे.
पोलिस चौकी हा नागरिकांचा पहिला संपर्कबिंदू मानला जातो. एखादा गुन्हा, अपघात, महिलांवरील अत्याचार किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांचा पहिला आधार म्हणजे पोलिस चौकी. मात्र, तीच चौकी ओसाड आणि बेवारस असेल, तर कायदा-सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होणे स्वाभाविक आहे.
याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांनी सांगितले की, या संदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा झाली असून, हा विषय नियोजन समितीच्या बैठकीत मांडला आहे. चौकीतील अस्वच्छता आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. गोकुळनगर पोलिस चौकी पुन्हा नियमितपणे कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
स्थानिक नागरिकांनीही तातडीने कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी नियुक्त करणे, चौक्यांची नियमित स्वच्छता, देखभाल आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लाखो रुपयांच्या सार्वजनिक निधीतून उभारलेल्या या चौक्या नागरिकांच्या सुरक्षेऐवजी मद्यपींचे अड्डेच बनून राहतील, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नाहीत; पोलिस चौक्यांमध्ये प्रत्यक्ष पोलिस उपस्थिती, स्वच्छता आणि सातत्यपूर्ण देखरेख ही काळाची गरज आहे. अन्यथा सुरक्षेचे प्रतीक असलेल्या या चौक्या प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत स्मारक ठरत राहतील.

COMMENTS