बीड: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात

बीड: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बीड येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ संचलित राजर्षी शाहू कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच राजमाता इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २२ जुलै रोजी भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा महोत्सवामध्ये खो-खो, कबड्डी, धावण्याच्या शर्यती यांसह विविध मैदानी खेळांचे सामने रंगणार असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, संघभावना, शिस्त आणि निरोगी स्पर्धेची भावना विकसित करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी या स्पर्धांमुळे उपलब्ध होणार आहे.
स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक स्पर्धांतील गुणवंत खेळाडूंना आकर्षक बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके यांनी केले आहे. संस्थेच्या वतीने स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

COMMENTS