मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाची हजेरी लागत असली, तरी आता पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. गुजरात किनारप

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाची हजेरी लागत असली, तरी आता पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. गुजरात किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने २२ ते २५ जुलैदरम्यान विविध जिल्ह्यांसाठी पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची सक्रियता कायम असून गुजरात किनारपट्टीवरील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगाने वाहणारे वारे अनुभवता येऊ शकतात.
आज २२ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा कायम आहे.
उद्या २३ जुलै रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर येलो अलर्ट राहील. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम राहणार असून जळगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २४ जुलै रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथा तसेच गोंदिया जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. २५ जुलै रोजी रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट कायम राहणार असून राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

COMMENTS