राहाता : स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनासाठी ओळख निर्माण केलेल्या बेंझिन अकॅडमीला महंत रामगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली.

राहाता : स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनासाठी ओळख निर्माण केलेल्या बेंझिन अकॅडमीला महंत रामगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अकॅडमीचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि परिसरातील प्रतिष्ठित सर्व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महंत रामगिरी महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, “आज तुम्ही ज्या जिद्दीने आणि चिकाटीने शिक्षण घेत आहात, त्यावरच तुमचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि शिस्त यांच्या बळावरच यश संपादन करता येते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि संस्थेचे नाव उज्ज्वल करण्याचा संकल्प केला पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. भूदान, गोदान, अन्नदान यांना जसे महत्त्व आहे, तसेच ज्ञानदान हे समाजाला समृद्ध करणारे श्रेष्ठ कार्य आहे. ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ती चोरीला जात नाही, तिच्यावर कोणताही कर लागत नाही आणि ती इतरांना दिल्याने कधीही कमी होत नाही. उलट ती अधिकाधिक वाढत जाते. एखाद्या व्यक्तीकडे भौतिक संपत्ती नसली तरी ज्ञान आणि बुद्धीच्या बळावर तो जीवनात मोठे यश मिळवू शकतो.”
महंत रामगिरी महाराज यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी शांतचित्ताने लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांचे आभार मानत बेंझिन अकॅडमीच्या शैक्षणिक कार्याला शुभेच्छा दिल्या.

COMMENTS