जिल्ह्यातील अवैध रेती उपसा, वाहतूक आणि बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस आणि महसूल पथकाने

जिल्ह्यातील अवैध रेती उपसा, वाहतूक आणि बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस आणि महसूल पथकाने असर्जन येथील गोदावरी नदी पात्रात संयुक्त छापा टाकून अवैधरित्या रेती उपसा करणार्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 45 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून, 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 जुलै 2026 रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, असर्जन येथील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस व महसूल पथकाने दोन पंचांसमक्ष संयुक्त छापा टाकला. या छाप्यात पथकाने नदी पात्रातून 2 बोटी, 3 इंजिन आणि 10 तराफे जप्त केले. तसेच प्रत्येक बोटी व तराफ्यावर मिळून एकूण 12 ब्रास रेती जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली साधने (बोटी व इंजिन) कापून, तोडून आणि जाळून नदी पात्रातच नष्ट करण्यात आली. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत 45 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी संतोष ऊर्फ लालु गाडे, बजरंग कुटे, कैलास कुटे (तिघे रा. असर्जन, ता. जि. नांदेड) आणि इतर दोन अनोळखी इसम अशा एकूण 5 आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 303(2), 3(5) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8) आणि पर्यावरण (संरक्षण) अधिनियम कलम 9, 15 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही धडक कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, आणि उप विभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण, पोहेकॉ कारामुंगे, पोहेकॉ जेंकुट, पोकॉ कदम, पोकॉ जमीर, पोकॉ सिरमलवार तसेच महसूल पथकाचे नायब तहसीलदार माचेवाड, मंडळ अधिकारी येलमटे व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक, अवैध दारू, जुगार आणि गुटखा विक्री करणार्यांविरुद्ध भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS