अंबाजोगाई : येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कूल (सीबीएसई) अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे पांडुरंग कडू पाटील यांना त्यांन

अंबाजोगाई : येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कूल (सीबीएसई) अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे पांडुरंग कडू पाटील यांना त्यांनी इंग्रजी विषयात केलेल्या मुलभूत संशोधनासाठी पीएचडी जाहीर झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांच्यासह शैक्षणिक वर्तुळातून डॉ.पांडुरंग पाटील यांचे अभिनंदन होत आहे.डॉ.पांडुरंग कडू पाटील (रा.माळेगाव, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव) येथील रहिवासी असून सध्या ते न्यू व्हिजन पब्लिक स्कूल (सीबीएसई) अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून इंग्रजी विषयात संशोधन केले. त्यांच्या संशोधनाचा विषय माध्यमिक स्तरावर डिजिटल साधनांच्या माध्यमातून शब्दसंग्रह (व्होकॅबलरी) शिकवण्याची प्रभावीता : एक अभ्यास असा होता. त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून डॉ.अनिल पंढरीनाथ पाटील (सहयोगी प्राध्यापक, श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि:जळगाव, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र इंग्रजी प्राध्यापक परिषद, माजी इंग्रजी अभ्यास मंडळ सदस्य, कबचौ उमवि, जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या संशोधनाचा मुख्य निष्कर्ष किंवा समाजोपयोगी महत्त्व असे की, इंग्रजीच्या शिक्षकांनी इंग्रजी शिकवताना डिजिटल टूल या टेक्नॉलॉजीचा वापर करून शिकवल्याने विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या शब्दसाठ्यामध्ये अमुलाग्र बदल होतो असे दिसून आले. म्हणून इंग्रजी शिक्षकांनी अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्स या तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे व त्यासाठी विविध डिजिटल टूल्स कसे वापरावे याचे प्रशिक्षण सुद्धा घेणे आवश्यक आहे. या संशोधनात संशोधकाने पूर्व चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना विविध डिजिटल टूल्स वापरून शिकवले व नंतर उत्तर चाचणी घेतली तर उत्तर चाचणी मध्ये विद्यार्थ्यांची प्रगती उत्कृष्ट असल्याचे दिसून आले. संशोधन पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 ते 5 वर्षांचा कालावधी लागला. या संशोधनादरम्यान हे संशोधन इंग्रजी शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचे असून ते कोणत्याही माध्यमांच्या शाळांना लागू होऊ शकते. याचा उपयोग इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो हे नवे निष्कर्ष समोर आले. डॉ.पांडुरंग पाटील हे सध्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूल (सीबीएसई) अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना एआयसीडीसी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आयडियल प्रिन्सिपल अवॉर्ड, द्रोणाचार्य पुरस्कार, ऍक्टिव्ह प्रिन्सिपल अवॉर्ड, तसेच त्यांना शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत विविध प्रमाणपत्रे, पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. ते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ), आय.एस.टी.एम. प्रमाणित मास्टर रिसोर्स पर्सन ही आहेत. त्यांचे विविध शैक्षणिक विषयाशी संबंधित अनेक अभ्यासपूर्ण शोधनिबंध (रिसर्च पेपर्स) प्रकाशित झालेले आहेत. हे त्यांचे विशेष पुरस्कार आणि सन्मान आहेत. पीएचडी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, व्यवस्थापकीय संचालक संकेत मोदी व सौ.डिंपल मोदी, मार्गदर्शक प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, माजी उपप्राचार्य वसंतराव चव्हाण, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.विष्णुपंत सोळंके, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संतोष तरके, अकॅडमिक डायरेक्टर विनायक मुंजे, एच.आर डायरेक्टर राघवेंद्र राजमान्य, मुख्याध्यापक प्रदीप सोनी व शाळेचे सर्व समन्व्यक, अध्यापक व अध्यापकेत्तर वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक, संशोधन केंद्राचे चेअरमन, कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी व इंग्रजी माध्यमांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, ग्रंथपाल, ईएलटी एक्स्पर्ट, सर्व सहकारी मित्र, कुटुंबातील सर्व सदस्य तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणार्यांना दिले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पुढील काळात संशोधनपर निबंध प्रकाशित करणे, संशोधनाविषयी पुस्तके लिहिणे व ग्रामीण भागातील मुलांसाठी इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने कसा शिकवला जाईल याचे तंत्र विकसित करणे हे उद्दिष्ट असल्याचे प्राचार्य डॉ.पाटील यांनी सांगितले आहे.

COMMENTS