कर्जत : कांद्याला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा कर

कर्जत : कांद्याला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यातून कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना तब्बल १८७ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक लाभ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.गत हंगामात कांद्याच्या दराने निचांकी पातळी गाठल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले होते. अनेकांना वाहतूक खर्चही स्वतःच्या खिशातून करावा लागला. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्यभर कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत लासलगाव, चांदवड आणि मंचरसह विविध ठिकाणी आंदोलने केली. कर्जत-जामखेड मतदारसंघातही रास्ता रोको आंदोलन करून हमीभाव वाढविण्याची मागणी करण्यात आली.आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने सुरुवातीला नाफेडमार्फत १,२०० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र हा दर अपुरा असल्याचे सांगत आमदार पवार यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने हमीभाव वाढवत तो २,१२५ रुपये प्रति क्विंटल केला. यामुळे खुल्या बाजारातील कांद्याचे दरही वाढले आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, कर्जत तालुक्यात गत हंगामात सुमारे २ लाख ९१ हजार टन कांद्याचे उत्पादन झाले. त्यापैकी ३० टक्के कांदा तातडीने विकला गेला, तर उर्वरित २ लाख ४ हजार टन कांद्याला सरासरी ७ हजार रुपये प्रति टन वाढीव दर मिळाल्याने शेतकऱ्यांना १४२ कोटी ८७ लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ झाला.जामखेड तालुक्यात ९३ हजार ३१५ टन कांद्याचे उत्पादन झाले. त्यातील ७० टक्के म्हणजे ६५ हजार ३२० टन कांद्याला सरासरी ७ हजार रुपये प्रति टन वाढीव दर मिळाल्याने ४५ कोटी ७२ लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ झाला. याप्रमाणे कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना एकूण १८७ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

COMMENTS