Homeताज्या बातम्या

आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध स्पर्धाजागतिक सहकार दिन उत्साहात साजरा

आनंदगाव (ता. केज, जि. बीड) येथील आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा, उत्स्फू

आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात विविध स्पर्धाजागतिक सहकार दिन उत्साहात साजरा
वसंतराव नाईक हरितक्रांतीचे प्रणेते; त्यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन उत्साहात साजरा – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड
आनंदगाव-सारणी रस्त्याची चाळण: गुडघाभर खड्ड्यांतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचा निषेध



आनंदगाव (ता. केज, जि. बीड) येथील आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा, उत्स्फूर्त भाषण स्पर्धा तसेच जागतिक सहकार दिनानिमित्त सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दि. 5 जुलै 2026 रोजी स्वानंद सार्वजनिक वाचनालयाच्या वाचनकक्षात शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या गटातील काव्यवाचन व उत्स्फूर्त भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. काव्यवाचन स्पर्धेत यशवंत सौदागर यांनी प्रथम, तर सोहम गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत सोहम गायकवाड यांनी प्रथम, तर आनंद गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.स्पर्धांचे परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड आणि शिवाजी सौदागर यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांचा सन्मान संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवक डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड, परीक्षक ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी सौदागर आणि संभाजी लवटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य आणि मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच दि. 3 जुलै 2026 रोजी जागतिक सहकार दिनानिमित्त सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या विचारातून सहकाराचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड होते. यावेळी माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव, कमलाकर साबळे, जनार्धन गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, एम.आय.टी. पुणेचे गोविंद गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड, रविंद्र गायकवाड आणि एस. के. वैरागे यांनी सहकार चळवळीचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड म्हणाले की, सहकार हीच विकास आणि समृद्धीची खरी गुरुकिल्ली आहे. ग्रामीण भागातील साखर कारखाने, सुतगिरण्या, पतसंस्था, सहकारी बँका, गृहनिर्माण संस्था, ग्राहक भांडारे, महिला बचत गट, शेतकरी गट, दूध डेअरी आणि सेवा सहकारी संस्था या सर्व सहकाराच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, महिला, नोकरदार, लघुउद्योजक आणि बेरोजगारांना रोजगार व आर्थिक बळ देण्याचे कार्य करत आहेत. विना सहकार नाही उद्धार हे ब्रीदवाक्य आजही तितकेच महत्त्वाचे असून, जागतिक पातळीपासून गावपातळीपर्यंत सहकार चळवळ समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही कार्यक्रमांचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS