Homeताज्या बातम्या

बीडच्या इतिहासात प्रथमच शालेय वाहतूक सुरक्षिततेवर भव्य कार्यशाळाजिल्हा वाहतूक शाखा, आरटीओ कार्यालय आणि रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम

बीड : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देत बीडच्या इतिहासात प्रथमच शालेय वाहतूक सुरक्षिततेवर व्यापक कार्यशाळेचे आयोजन करण्

पीएमश्री शाळेलाच कुलूप; शिक्षकांविना शिक्षणाचा बोजवारा!
बीड तहसील कार्यालयात ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्रा’ची सुरुवात; कायदेशीर मदत आणि शासकीय योजना आता एकाच छताखाली
आरक्षण वाचवण्यासाठी २६ जूनला चैत्यभूमीवर उपस्थित राहा; उपवर्गीकरणाला विरोध करण्याचे अ‍ॅड. तेजस वडमारे यांचे आवाहन


बीड : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देत बीडच्या इतिहासात प्रथमच शालेय वाहतूक सुरक्षिततेवर व्यापक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखा, आरटीओ कार्यालय, रोटरी सेंटर फॉर रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक अवेअरनेस तथा रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बंकटस्वामी महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेत शाळांचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, स्कूल बस व रिक्षाचालक, अटेंडंट, पालक प्रतिनिधी आणि रोटरी सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनचे अध्यक्ष रो. चंद्रप्रकाश सेठी, सचिव रो. मनोज थीगळे, रोटरी सेंटरचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश कोंका, मुख्य सल्लागार रो. इंजी. राहुल बोरा, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, मोटार वाहन निरीक्षक रणजीत पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शशिकांत जाधव आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. शंकर शिवशेट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत प्रमुख प्रशिक्षक प्रा. डॉ. प्रकाश कोंका यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचे विविध पैलू उलगडून सांगितले. रस्ता सुरक्षा नियम, वाहनांतील ब्लाइंड स्पॉट, स्कूल बस व रिक्षांसाठी आवश्यक सुरक्षा निकष, शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच शाळा व्यवस्थापन, पालक, चालक, अटेंडंट आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदार्‍यांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत ऑगस्टपासून बीड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मोटार वाहन निरीक्षक रणजीत पाटील यांनी शालेय वाहतूक करणार्‍या वाहनांची नियमित फिटनेस तपासणी, वैध परवाना आणि बॅजधारक चालकांकडूनच विद्यार्थ्यांची वाहतूक होणे आवश्यक असल्याचे सांगितले. शाळांनी पालक, चालक आणि अटेंडंट यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवून वाहतूक व्यवस्थेचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. चंपावती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी यांनी शासनाच्या निर्देशानुसार शाळेत विद्यार्थी वाहतूक समिती कार्यरत असून चालक, अटेंडंट आणि पालकांच्या नियमित बैठका घेत सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती केली जात असल्याची माहिती दिली. पालक प्रतिनिधी आघाव यांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने न देण्याचे आवाहन केले, तर जीनियस ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाबू आत्तार यांनी सर्व रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, अशी ग्वाही दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांनी व्यसन करून वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत चालक व अटेंडंट यांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.  कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. प्रकाश कोंका यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, मुख्याध्यापक, पालक, चालक, अटेंडंट, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, रोटरी सदस्य आणि सर्व सहभागींचे आभार मानले. बीडच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ही शालेय वाहतूक सुरक्षितता कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, पालक, वाहतूक व्यावसायिक आणि प्रशासन यांना एकाच व्यासपीठावर आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. रस्ता सुरक्षा जनजागृतीच्या दिशेने हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
नियमभंग करणार्‍यांवर कठोर कारवाईचा इशारा
शालेय वाहतुकीत कोणताही नियमभंग अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन किंवा सुरक्षिततेशी तडजोड करणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रत्येक चालक, अटेंडंट आणि संबंधित संस्थेची जबाबदारी आहे.
– वैभव पाटील
प्रभारी पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, बीड

COMMENTS