Homeताज्या बातम्या

किनवट पालिकेचा ’कुंभकर्णी’ कारभारमोकाट जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट, निष्पापांचे बळी जाईपर्यंत प्रशासन ’उघड्या डोळ्यांनी’ पाहणार का?

शहरात सध्या पालिका प्रशासन आणि बेजबाबदार पशुपालकांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाचा खेळ सुरू आहे. काम संपले की जनावर रस्त्यावर

जागतिक पर्यावरण दिन: किनवट वनविभागातर्फे बेंदी रोपवाटिकेत वृक्षलागवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
किनवटमध्ये ’सहकार’ की ’स्वाहाकार’?विद्यमान सभापतींच्या लेटरबॉम्बने राजकीय भूकंप!
मुसळधार पावसात वनविभागाची गस्त; चिखली परिसरात 8 तस्कर लाकूड टाकून पसार



शहरात सध्या पालिका प्रशासन आणि बेजबाबदार पशुपालकांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाचा खेळ सुरू आहे. काम संपले की जनावर रस्त्यावर या नफेखोर वृत्तीमुळे किनवटच्या प्रमुख रस्त्यांवर सध्या मोकाट जनावरांचे साम्राज्य निर्माण झाले असून, अपघातांची एक भीषण मालिकाच सुरू झाली आहे. निष्पाप नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना, स्थानिक नगरपालिका आणि पोलीस प्रशासन मात्र हातावर हात धरून केवळ ’तमाशा’ पाहत असल्याने जनतेचा संताप आता अनावर झाला आहे.
गेल्या काही महिन्यांत किनवटमधील मुख्य चौक, रस्ते आणि महामार्गांवर गाढवे, खेचरे, गाई आणि वासरांनी अक्षरशः ठाण मांडले आहे. रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहनधारकांना ती दिसत नाहीत. परिणामी, दररोज भीषण अपघात घडत आहेत. या अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर कित्येक तरुण कायमचे अपंग (जायबंदी) झाले आहेत. गाड्यांचा चक्काचूर झाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काही रेती व्यावसायिक आणि पशुपालक या जनावरांकडून दिवसभर कष्टाची कामे करून घेतात. मात्र, संध्याकाळ झाली की त्यांच्या खाण्या-पिण्याची आणि निवार्‍याची जबाबदारी झटकून त्यांना थेट रस्त्यावर हाकलून दिले जाते. मालकांच्या या निर्दयी आणि क्रूर वृत्तीला प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे खतपाणी मिळत आहे. नगरपरिषद या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष करत आहे. कधीतरी एखादी तोंडदेखली कारवाई करून, जनावरांच्या मालकांना नाममात्र दंड ठोकून सोडून दिले जाते. हा दंडाचा फार्स म्हणजे मालकांसाठी ’परवाना’ ठरत असून, त्यांचे धाडस अधिकच वाढले आहे. प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल आता प्रत्येक किनवटकर विचारत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नागरिकांनी आता प्रशासनाला शेवटचा इशारा देत खालील मागण्या लावून धरल्या आहेत: रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणार्‍या बेजबाबदार मालकांवर थेट फौजदारी आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत, अपघातातील मृतांच्या कुटुंबाला, जखमींच्या उपचाराचा आणि वाहनांच्या नुकसानीचा संपूर्ण खर्च थेट संबंधित जनावरांच्या मालकाकडून वसूल करण्यात यावा, शहरातील सर्व मोकाट जनावरांना तात्काळ पकडून त्यांची रवानगी कोंडवाड्यात किंवा गोशाळेत करण्यात यावी. एकंदरीत, जनावरांचे मालक आणि पालिका प्रशासन दोघेही कुंभकर्णी झोपेत आहेत. जनतेच्या संयमाचा बांध आता सुटला असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर संतप्त किनवटकर रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन छेडतील, असा थेट आणि जाहीर इशारा नागरिकांनी दिला आहे. आता तरी पालिकेला जाग येणार की आणखी कोणाचा बळी जाण्याची वाट पाहिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS