किनवट वनपरिक्षेत्रातील चिखली (बु.) नियतक्षेत्रांतर्गत येणार्या झेंडीगुडा जंगलात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करण्याचा तस्करांचा मोठा प्रयत्न वनविभ

किनवट वनपरिक्षेत्रातील चिखली (बु.) नियतक्षेत्रांतर्गत येणार्या झेंडीगुडा जंगलात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करण्याचा तस्करांचा मोठा प्रयत्न वनविभागाच्या फिरत्या पथकाने रविवारी (दि. 5) यशस्वीरित्या उधळून लावला. वन कर्मचार्यांची चाहूल लागताच आठ संशयित तस्करांनी मुसळधार पाऊस आणि जंगलातील दाट झाडीचा फायदा घेत मुद्देमाल टाकून घटनास्थळावरून पळ काढला. वनविभागाने घटनास्थळावरून सर्व सागवान लाकूड जप्त केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
वनविभागाचे फिरते पथक चिखली (बु.) अंतर्गत झेंडीगुडा जंगल परिसरात नियमित गस्त घालत होते. यादरम्यान डोंगरावरून काही व्यक्ती खाली उतरत असल्याचा आवाज पथकाला आला. संशय आल्याने पथकाने तातडीने त्या दिशेने धाव घेतली असता, चिखली गावातील आठ जण खांद्यावरून सागवान लाकूड घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले. वन कर्मचार्यांनी त्यांचा पाठलाग सुरू करताच, पकडले जाण्याच्या भीतीने संशयीतांनी हातातील लाकूड खाली टाकले आणि मुसळधार पाऊस तसेच जंगलातील दाट झाडीचा गैरफायदा घेत तेथून पोबारा केला. वनविभागाने तत्परता दाखवत घटनास्थळावरील सर्व सागवान लाकूड जप्त करून ते वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. जप्त केलेल्या मुद्देमालाची मोजदाद केली असता, त्यात: कट साईज लाकूड: 4 नग (0.1664 घनमीटर) तर गोल सागी नग: 6 नग (0.183 घनमीटर) बाजारभावानुसार या जप्त केलेल्या लाकडाची अंदाजे किंमत 7 हजार 472 रुपये इतकी आहे. हे जप्त केलेले लाकूड राजगड वन आगारात जमा करण्यात आले आहे. संबंधित फरार संशयितांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध ’भारतीय वन अधिनियमांतर्गत’ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. ही कारवाई नांदेड विभागाच्या उपवनसंरक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, वनपरिमंडळ अधिकारी बी. टी. जाधव, वनरक्षक व्ही. एस. मुळे, बालाजी झम्पलवाड, ओम शिंदे, रवी दांडेगावकर, मंगला दांडेगावकर, वनमजूर राजू रबडे, एल. शिंदे, टी. सिडाम, जंगू सिडाम, तेलंगणा वनविभागातील तीन वनमजूर तसेच वाहनचालक बाळकृष्ण आवळे यांच्या संयुक्त पथकाने केली. वनविभागाच्या या सतर्कतेमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

COMMENTS