Homeताज्या बातम्या

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतहवामान विभागाचा आज पावसाचा रेड अलर्ट ; प्रशासन सतर्क

मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणार्

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 
कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करा : किसान सभा
पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; वाहतूक ठप्प
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...


मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणार्‍या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवामान विभागाने शनिवारी, 4 जुलैसाठी मुंबईला रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.हवामान विभागाच्या जिल्हानिहाय ताज्या अंदाजानुसार, मुंबईतील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते. हा अंदाज अत्यंत शक्यतेच्या श्रेणीत मोडत असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबईबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सखल भागांपासून दूर राहावे तसेच समुद्रकिनारा आणि झाडांच्या परिसरात विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबईत सलग तिसर्‍या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत असून अंधेरी, जोगेश्‍वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विले पार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरात पावसाचा जोर अधिक होता. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. अंधेरी येथील भुयारी मार्गात सुमारे दोन फूट पाणी साचल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर राबविल्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाली असून आता या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम उपनगरी रेल्वे सेवांवरही झाला. मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या, तर पश्‍चिम मार्गावरील रेल्वे सेवा पंधरा ते वीस मिनिटे विलंबाने सुरू होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. कोकण किनारपट्टीसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला असून पालघर, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि सातारा परिसरासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
7 जुलैपर्यंत पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज
राज्यातील इतर भागांमध्येही 7 जुलैपर्यंत पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत सरासरी 204 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मलबार हिल येथे 146 मिलीमीटर, फोर्टमध्ये 139, अंधेरीत 136, वर्सोवा येथे 129, पवईमध्ये 124, मानखुर्दमध्ये 118, भांडुपमध्ये 116 आणि मुलुंडमध्ये 115 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील बहात्तर तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांत चोवीस तासांत दोनशे मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS