वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव किंवा खर्चाचा दिवस नसून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याची संधी आहे हा संदेश देत पोलीस जमादार विलास खरात यांनी आपला

वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव किंवा खर्चाचा दिवस नसून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याची संधी आहे हा संदेश देत पोलीस जमादार विलास खरात यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. श्रीक्षेत्र चाकरवाडीजवळील कळसंबर येथील आपला परिवार वृद्धाश्रमात वृद्धांना किराणा साहित्य व फळांचे वाटप करून त्यांनी वाढदिवस समाजसेवेला अर्पण केला.
यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. वृद्धांना आवश्यक किराणा साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहर्यावर समाधानाचे आणि आनंदाचे हास्य उमटले. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत विलास खरात यांच्या संवेदनशीलतेचे अभिनंदन केले. कार्यक्रमात आपला परिवार वृद्धाश्रमाचे संचालक सुनील पवार यांनी विलास खरात यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच सौ. शोभा सुनील पवार यांनी औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पोलीस जमादार विलास खरात म्हणाले की,वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. गरजू वृद्धांच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळाला हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट आहे.आजचा दिवस अशा सेवाकार्यात घालवता आल्याने माझा वाढदिवस खर्या अर्थाने सार्थकी लागला. कळसंबर येथे सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पवार यांनी अनेक वर्षांपासून गोरगरीब, निराधार आणि वयोवृद्धांसाठी आपला परिवार वृद्धाश्रम सुरू केला असून या आश्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळत आहे. अशा सेवाभावी संस्थेला मदतीचा हात देत विलास खरात यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले. यावेळी धुनकवाडचे सरपंच भागवत गव्हाणे, पत्रकार अविनाश मुजमुले, जगदीश गोरे, ज्ञानेश्वर यादव, नेकनूर येथील हाबाडा कॉम्प्युटर सेंटरचे संचालक सलीम पाशा शेख, नुमान मनियार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून पोलीस जमादार विलास खरात यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

COMMENTS