शेवगाव : "ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला

शेवगाव : “ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला असून, आपण मुर्दाडसारखे पडून राहणे योग्य नाही. इतर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी पाणी पळवून नेण्याच्या प्रयत्नांत असताना, धरण उशाला असूनही आपण मात्र तहानलेले आहोत. तालुक्याच्या इतिहासातील “कोपरे धरणाचे पाणी लाडजळगाव पर्यंत आणू” ही एक निव्वळ वल्गना ठरल्याने ‘जसा या योजनेचा दहावा’ घातला तशी वेळ ‘ताजनापूर’वर येऊ नये यासाठी वेळीच जागे होऊन पाणी मिळेपर्यंत मागे हटायचे नाही, असा एल्गार ऍड. शिवाजीराव काकडे यांनी केला. शासन-प्रशासनाने हा प्रश्न तातडीने न सोडवल्यास थेट राज्याचे उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’ या योजनेच्या पूर्णत्वासाठी शेवगाव येथील श्री संत गाडगे महाराज छात्रालयामध्ये रविवारी (दि. २८) लाभार्थी गावातील शेतकरी, युवक आणि महिलांची अत्यंत निर्णायक बैठक ऍड. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे, माणिक म्हस्के, जगन्नाथ गावडे, नवनाथ ढाकणे, लक्ष्मण गवळी आदींसह बहुसंख्या नागरिक उपस्थित होते.
..तर उपमुख्यामंत्र्यांसह जलसंपदामंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा : ऍड.काकडे
या बैठकीत जुनी ताजनापूर कृती समिती बरखास्त करून नव्या कृती समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या निमंत्रकपदी लक्ष्मणराव गवळी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, योजनेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक गावात महिला व युवकांसह स्वतंत्र ग्रामस्तरीय कृती समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. या समित्यांच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवून संघर्ष अधिक तीव्र केला जाणार आहे. शासनाचे आणि संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली असून “जर शासन आणि प्रशासनाने ताजनापूर योजनेचा प्रश्न तातडीने निकाली काढला नाही, तर थेट राज्याचे उप मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री यांच्या कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात येईल,” असा स्पष्ट मनोदय समितीचे अध्यक्ष ऍड.काकडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

COMMENTS