श्रीरामपूर: "कोणताही समाज हा एकीतूनच पुढे जातो. कुंभार समाज अत्यंत शांत, संयमी, कष्टाळू, ज्ञानशील आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारा आहे. अल

श्रीरामपूर: “कोणताही समाज हा एकीतूनच पुढे जातो. कुंभार समाज अत्यंत शांत, संयमी, कष्टाळू, ज्ञानशील आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारा आहे. अलीकडच्या काळात तो काही गटांत विभागला गेला आहे; असे न करता कुंभार समाजाची प्रगती ही एकीतूनच होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे,” असे आवाहन पुणे येथील कुंभार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव सुपेकर यांनी केले.
श्रीरामपूर येथील ‘स्वागत मंगल कार्यालयात’ श्री संत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वसंतराव सुपेकर यांच्या सेवाकार्याबद्दल ग्रंथभेट देऊन व त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी सुपेकर बोलत होते. या कार्यक्रमाला पी.एस.आय. मेजर नंदकुमार संतराम सैंदाणे, पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ कार्यकर्ते शरदराव कुंभार, रामदास कुंभार, सौ. अनुपमा कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
वसंतराव सुपेकर यांनी पुढे बोलताना, १९६० च्या दशकात त्यांचे वडील कृष्णाजी सुपेकर यांनी पुणे येथे महाराष्ट्र राज्य पातळीवर घेतलेल्या कुंभार समाज मेळाव्याच्या आणि एकमुखी समाज बांधणीच्या आठवणींना उजाळा दिला. अशी समाजभक्ती आणि सेवानिती आजच्या समाज घटकांमध्ये टिकून राहिली, तरच आपला कुंभार समाज प्रगतीपथावर राहील, अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली. तसेच पी.एस.आय. मेजर नंदकुमार सैंदाणे व लेखक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या कार्याचे सुपेकर यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार शरदराव कुंभार यांनी मानले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे साहित्य संस्कृतीनिष्ठ: सैंदाणे
“श्रीरामपूर हे आधुनिक शहर असून या शहरात श्रीरामपूर नगर परिषदेची स्थापना १ सप्टेंबर १९४७ रोजी झाली. गेल्या सुमारे ७९ वर्षांपासून या शहराची सांस्कृतिक आणि वाङ्मयीन जडणघडण होत आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये हे या शहरात १९६४-६५ पासून कार्यरत असून १९७७ पासून ते साहित्य चळवळीत सक्रिय आहेत. त्यांचे साहित्य हे पूर्णपणे संस्कृतीनिष्ठ असून ते समाजाने जरूर वाचले पाहिजे,” असे आवाहन पी.एस.आय. मेजर नंदकुमार सैंदाणे यांनी या वेळी केले.

COMMENTS