मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात संघटनात्मक कामकाजातील शिथिलतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात संघटनात्मक कामकाजातील शिथिलतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश दिले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्तरावर सक्रियता वाढवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी 29 जूनपर्यंत कामाचा आढावा घेण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.
राज ठाकरे म्हणाले की, निवडणुकांच्या तयारीसाठी मजबूत संघटनात्मक यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. विभागप्रमुख, उपविभागप्रमुख आणि शाखा प्रमुख यांनी सातत्याने जनतेत राहून काम करावे. घरात बसून राजकारण होत नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पदाधिकार्यांना उद्देशून सांगितले की, वरिष्ठांचा प्रभाव आणि संघटनात्मक शिस्त टिकवून ठेवली गेली पाहिजे. वेळ कमी असून प्रत्येकाने स्वतःसह कुटुंबातील सदस्यांनाही पक्षकार्याशी जोडण्याचा प्रयत्न करावा. मतदार यादीशी संबंधित कामाबाबतही त्यांनी विशेष सूचना दिल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिनिधी नियुक्त करण्याचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधींची आवश्यकता असून त्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी दिले. मतदारांच्या नावांची नोंद, पडताळणी आणि आवश्यक दुरुस्ती याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की, मतदारांची नावे कमी झाली किंवा वगळली गेली, तर त्याचा थेट परिणाम निवडणूक कामगिरीवर होऊ शकतो. 29 जूननंतर कामाचा सविस्तर अहवाल घेण्यात येणार असून, अपेक्षित कामगिरी न करणार्यांविरोधात संघटनात्मक निर्णय घेतले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
खा. संजय दीना पाटील यांनी केलेल्या कथित आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी अशा विधानांवर कठोर शब्दांत टीका केली. लोकशाही व्यवस्थेत जनप्रतिनिधींनी संयम आणि जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांवर समानपणे लागू होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

COMMENTS