किनवट: तालुक्यापासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर, विदर्भ-मराठवाड्याच्या सरहद्दीवरील जंगलाने वेढलेल्या भूलजा या छोट्याशा गावात एका पिसाळलेल्या कुत्

किनवट: तालुक्यापासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर, विदर्भ-मराठवाड्याच्या सरहद्दीवरील जंगलाने वेढलेल्या भूलजा या छोट्याशा गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या २४ तासांत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्याने एका अडीच वर्षांच्या चिमुकलीसह दोन जणांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेमतेम ५०० ते ५५० लोकसंख्या असलेल्या भूलजा गावात सोमवारी (२२ जून) बाहेरून एक पिसाळलेले कुत्रे शिरले. सायंकाळच्या सुमारास गावातील सारनाथ वाठोरे यांची अडीच वर्षांची चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत असताना, या कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला करून थेट तिच्या मानेचा लचका तोडला. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील महिलांनी तातडीने धाव घेत प्रसंगावधान राखल्यामुळे चिमुकलीचे प्राण वाचले.
हा थरार एवढ्यावरच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी, मंगळवारी (२३ जून) सकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रकाश बोंबले हे आपल्या घरासमोर झाडझूड करत असताना, याच कुत्र्याने त्यांच्यावरही हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्याने बोंबले यांच्या गालाला जबर चावा घेऊन गंभीर जखमी केले. या लागोपाठच्या घटनांमुळे गावातील तरुण लाठ्या-काठ्या घेऊन कुत्र्याला हुसकावण्यासाठी एकत्र आले. कुत्र्याला शोधत असताना त्याने अंबाजी साळवे या आणखी एका इसमावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, साळवे यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या हल्ल्यातील जखमींवर गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यामुळे भूलजा गावातील नागरिक, महिला आणि लहान मुलांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून लोक घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. संबंधित प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

COMMENTS