बीड: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात धडक कारवाई सु

बीड: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात धडक कारवाई सुरू आहे. सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेला धोका निर्माण करणार्या एका धोकादायक गुंडावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.
गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील सिद्धार्थ शहादेव पटेकर (वय ४२) याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशानुसार पटेकर याला एमपीडीए कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून, त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
सिद्धार्थ पटेकर याच्याविरोधात तलवडा पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, लूटमार, मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल असून, त्यापैकी दोन गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत तर तीन गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
यापूर्वीही पटेकर याच्यावर प्रतिबंधात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा न झाल्याने तलवडा पोलीस ठाण्याने ११ मे २०२६ रोजी एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकार्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी २३ जून २०२६ रोजी आदेश पारित करून संबंधित इसमास तात्काळ स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तलवडा पोलिसांनी २३ जून रोजी रात्री त्याला ताब्यात घेऊन २४ जून रोजी पहाटे त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा, गुटखा विक्री, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे समाजकंटक, खंडणीखोर, दादागिरी करणारे गुंड यांच्याविरोधात एमपीडीए आणि एमसीओसीए कायद्यांतर्गत यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS