परळी शहरातील गजबजलेल्या आणि उच्चभ्रू वस्ती परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात सं

परळी शहरातील गजबजलेल्या आणि उच्चभ्रू वस्ती परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. भरधाव वेगाने धावणार्या काळ्या रंगाच्या थार वाहनाने प्रशांत प्रल्हादराव देशमुख या युवकाला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या प्रशांत देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत देशमुख हे पार्सल सेवा वितरणाचे काम करत होते. शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कामानिमित्त परिसरात असताना भरधाव वेगाने आलेल्या थार वाहनाने त्यांना चिरडले. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करत जखमी प्रशांत यांना उपचारासाठी परळी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघात घडलेला परिसर हा शासकीय कार्यालये, निवासी वसाहती, बंगल्यांची वस्ती आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेला भाग असल्याने अशा ठिकाणी भरधाव वाहन चालविले जात असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घटनेची सत्यस्थिती समोर येण्यास मदत होणार असून संबंधित वाहनचालकाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी वाहनचालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मृत प्रशांत देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. या दुर्दैवी घटनेनंतर परळी शहरात शोककळा पसरली असून, एका निष्पाप युवकाचा जीव घेणार्या बेदरकार वाहनचालकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS