Homeताज्या बातम्या

शेतकर्‍यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा; सौहार्दाने वागा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमहसूल यंत्रणेला जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश; शेतरस्ते अडविणार्‍या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश

बीड : महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांनाचारा आणि बांबू लागवडीसाठी केवळ एक रुपयात जमीन
अधिकारांविना ग्रामपंचायत प्रशासक निष्क्रियविकासकामे ठप्प; अधिकार द्यावेत किंवा अधिकारी प्रशासक नेमण्याची ग्रामस्थांची मागणी


बीड : महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न तातडीने सोडविणे ही महसूल यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेषतः शेतरस्ते हे शेतकर्‍यांच्या शेतीशी आणि जीवनाशी थेट संबंधित असल्याने अडविलेले व वादग्रस्त शेतरस्ते प्राधान्याने मोकळे करावेत तसेच ग्रामीण नागरिकांशी सौहार्दाने, संवेदनशीलतेने आणि सौजन्याने वागावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
तहसील कार्यालय बीड येथे शुक्रवारी मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महसूल विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अधिकारी व कर्मचार्‍यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. शेतकर्‍यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी शेतरस्त्यांची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्ते अडविले गेल्याने शेतकर्‍यांना शेती कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये विलंब न करता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रस्ते मोकळे करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. शेतकरी हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असून त्यांच्या समस्या केवळ महसुली विषय म्हणून न पाहता मानवी दृष्टिकोनातून सोडविण्याची गरज आहे. प्रशासनाने गावपातळीवर जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीच्या प्रारंभी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे स्वागत करून बीड तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध महसुली उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान, अतिक्रमणमुक्त शेतरस्ते मोहीम, महसूल सेवा शिबिरे, फेरफार प्रकरणांचा निपटारा, डिजिटल सेवा वितरण, नैसर्गिक आपत्ती पंचनामे तसेच शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. तालुक्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकार्‍यांना नागरिकाभिमुख प्रशासन राबविण्याचे निर्देश दिले. अधिकारी-कर्मचार्‍यांनी आपल्या मुख्यालयात व कार्यालयात अधिकाधिक वेळ उपलब्ध राहावे, जेणेकरून नागरिकांना महसूल सेवांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी दिलेल्या अर्जांचा वेळेत निपटारा करावा, प्रत्येक प्रकरणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत महसूल वसुली, फेरफार प्रकरणे, ई-अभिलेख, नागरिक सेवा, संजय गांधी निराधार योजना, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच इतर महसुली कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. संजय गांधी विभागातील कामकाज, लाभार्थी प्रकरणे तसेच गौण खनिज विभागातील नोंदी तपासून संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. महसुली कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला. या बैठकीस तहसीलदार चंद्रकांत शेळके, तहसीलदार सुरेंद्र डोके, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, संभाजी थोटे, अण्णासाहेब वंजारे, प्रशांत सुपेकर, सहाय्यक महसूल अधिकारी महादेव चौरे, राहुल कसबे, वामन तोगरगे यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. महसूल कर्मचारी संघटना तसेच मंडळ अधिकारी-तलाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीच्या शेवटी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी आभार मानले. महसूल प्रशासनाने केवळ कागदोपत्री कामकाज न करता प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधावा, शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करावा, असा संदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला.

COMMENTS