Homeताज्या बातम्या

आज ‘मृग’ संपले ; ‘आर्द्रा’कडे लागले डोळे  पाऊस लांबल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी हतबल ; पेरण्या ठप्प, जमिनी ओसाड  

अहिल्यानगर : मृग नक्षत्राचा कालावधी रविवारी (दि. २१) संपत असतानाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या

बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे
शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू
कर्जत बाजार समितीत सोमवार-गुरुवारी नियमित लिलाव : तापकीर    


अहिल्यानगर : मृग नक्षत्राचा कालावधी रविवारी (दि. २१) संपत असतानाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. मशागतीची सर्व कामे पूर्ण करून बियाणे व खते घरात आणून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राकडून मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. पाऊस लांबल्याने शेतकरी हतबल झाला असून जिल्ह्यातील बहुतांश शेती अजूनही पेरणीविना ओसाड पडली आहे.
यंदा २५ मेपासून सुरू झालेले रोहिणी नक्षत्र जवळपास कोरडेच गेले. त्यानंतर ८ जूनपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्रातही दमदार पावसाची अपेक्षा होती. मृग नक्षत्राचे वाहन ‘बेडूक’ असल्याने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, संपूर्ण नक्षत्रात अधूनमधून हलक्या सरी वगळता पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे आता सोमवारी (दि. २२) सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आर्द्रा नक्षत्राचे वाहन ‘गाढव’ असल्याचे मानले जाते.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली असून अनेकांनी मे महिन्याच्या अखेरीसच बियाणे आणि खतांची खरेदी केली आहे. मात्र, जमिनीत आवश्यक ओलावा नसल्याने पेरण्या सुरू करता आलेल्या नाहीत. त्यामुळे घरात बियाण्याची पोती पडून आहेत, तर शेतात पेरणीची प्रतीक्षा कायम आहे.
गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यातील सुमारे ७० ते ८० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र जून महिना संपत आला तरी बहुतांश क्षेत्र कोरडेच आहे. उडीद, मूग, तूर, सोयाबीन आणि मका या प्रमुख खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा विलंब आणखी वाढल्यास पिकांच्या नियोजनात बदल करावा लागण्याची शक्यता असून उत्पादन घटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
सध्या जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंशांच्या आसपास असून उष्णतेची तीव्रता कायम आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. पुढील काही दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असली, तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
 
 चौकट
प्रशासन ऍक्शनमोड वर
एल निनोच्या प्रभावामुळे पावसास उशीर झाल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या धरणांमधील तसेच मध्यम व लघु प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील पशुधनाला चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे चारा उपलब्धतेचा आढावा घ्यावा. गावनिहाय आणि तालुकानिहाय चाऱ्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर जाणार नाही, याची दक्षता घेत पशुपालकांना वेळेवर मदत मिळेल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

COMMENTS