श्रीरामपूर : शहरातील पाण्याच्या पाटाजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काड

श्रीरामपूर : शहरातील पाण्याच्या पाटाजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चॉपर आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये (आर्म्स अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाझीम पठाण (वय २५, रा. वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) आणि मोहम्मदजाफर पटेल (वय १८, रा. काझीबाबा, श्रीरामपूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता.
शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जर्मन हॉस्पिटलच्या मागे पाण्याच्या पाटाजवळ दोन संशयित व्यक्ती गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये नाझीम पठाण याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व मोबाईल, तर मोहम्मद पटेल याच्याकडून दोन जिवंत काडतुसे, धारदार चॉपर आणि मोबाईल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत हे हत्यार शाहरुख पटेल (रा. संजयनगर, श्रीरामपूर) याच्याकडून घेतल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. संबंधित मुख्य आरोपी शाहरुख पटेल सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

COMMENTS