श्रीगोंदा : तालुक्यातील वडाळी रोड परिसरातील जंगलात जाळून टाकलेल्या अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणाचा श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा क

श्रीगोंदा : तालुक्यातील वडाळी रोड परिसरातील जंगलात जाळून टाकलेल्या अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणाचा श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ (रा. काळकाई चौक, श्रीगोंदा) याचे मृत अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दि. १५ जून रोजी दुपारच्या सुमारास दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. या रागाच्या भरात शुभम ओव्हाळ याने लोखंडी रॉड आणि फरशीच्या साहाय्याने मुलीच्या डोक्यावर गंभीर वार करून तिचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मृतदेह जंगलात नेऊन जाळला घटना घडल्यानंतर आरोपीने केडगाव (अहिल्यानगर) येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या आई-वडिलांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मुख्य आरोपी आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला. त्यानंतर हा मृतदेह वडाळी रोड परिसरातील जंगलात नेण्यात आला. तेथे जंगलातील लाकडे गोळा करून मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, वडाळी रोड परिसरातील जंगलात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी शुभम ओव्हाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर या दोघांनाही रीतसर अटक करण्यात आली आहे.
या गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

COMMENTS