श्रीगोंदा : तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या लिंपणगावमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, घोड कालव्यावरून गाव तलावात पाणी आणण्या

श्रीगोंदा : तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या लिंपणगावमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, घोड कालव्यावरून गाव तलावात पाणी आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाईपलाईन योजना निष्क्रिय ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिंपणगावच्या गाव तलावात घोड कालव्यावरील पाणी सोडण्यासाठी सुमारे दीड किलोमीटर अंतरावरून पाच इंच व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली होती. गावात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना अपयश आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काष्टी–लिंपणगाव–आढळगाव मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीच्या कामासाठी गावच्या गायरान जमिनीतील मुरूम संबंधित ठेकेदाराला देण्यात आला होता. त्याबदल्यात ठेकेदाराने घोड कालव्यापासून गाव तलावापर्यंत पाईपलाईन उभारून देण्याची जबाबदारी स्वीकारली होती. ठेकेदाराने आपला शब्द पाळत लाखो रुपये खर्च करून पाईपलाईनचे काम पूर्ण केले. परंतु घोड धरणातून आवर्तने सुरू असतानाही गाव तलावात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून घोड कालव्याजवळ विद्युत रोहित्र बसविण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. मात्र, विद्युत मोटार उपलब्ध असूनही त्याला वीज जोडणी देण्यात आली नाही. परिणामी, पाणी उपसा करून गाव तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था कागदावरच राहिली. वेळेत वीज जोडणी करून पाणी उपसा सुरू केला असता, गावातील जलसंकट मोठ्या प्रमाणात टाळता आले असते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील वाढत्या पाणीटंचाईमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन घोड कालव्यावरील योजना कार्यान्वित करावी, तसेच तोपर्यंत टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी माजी सरपंच अरविंद कुरुमकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
पाणी उशाला आणि कोरड घशाला लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली योजना प्रत्यक्षात उपयोगात न आल्याने सार्वजनिक निधीच्या वापराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे गावाजवळून कालवा वाहत असताना दुसरीकडे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने “पाणी उशाला आणि कोरड घशाला” अशी स्थिती लिंपणगावमध्ये निर्माण झाली आहे. आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS