नांदेड : सोलार प्रकल्प उभारून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन काम अपूर्ण ठेवत फसवणूक केल्याचा आरोप एका सोलार कंपनीवर करण्यात आला असून, याप्रक

नांदेड : सोलार प्रकल्प उभारून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन काम अपूर्ण ठेवत फसवणूक केल्याचा आरोप एका सोलार कंपनीवर करण्यात आला असून, याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भावसार नगर, नांदेड येथील रहिवासी विलास गंगाधरराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ‘पॅराबोलिक रिसोर्स सोलार एजन्सी’ या कंपनीच्या संचालकांनी सोलार प्रकल्प उभारून देण्याचे आश्वासन देत २१ मार्च २०२६ रोजी सुमारे ४ लाख रुपयांचा करार केला होता. त्यानुसार कंपनीने २ लाख ६० हजार रुपये धनादेशाद्वारे (चेकद्वारे) स्वीकारले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंपनीने एका आठवड्यात संपूर्ण काम पूर्ण करण्याची हमी दिली होती. मात्र तीन महिने उलटूनही काम पूर्ण झाले नसून केवळ काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे.
त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच कामगारांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उर्वरित कामाबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे व फोनवर अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी विलास कदम यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात सर्व कागदपत्रे व पुरावे सादर करून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांनी तक्रारीची दखल घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील तसेच इतर भागांतील ग्राहकांचीही अशा प्रकारे फसवणूक झाली आहे का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

COMMENTS