अकोले : अकोलेची भूमी अत्यंत असामान्य असून दक्षिणेतील पहिला आश्रम येथे स्थापन झाला. या आश्रमात अगस्ती ऋषींनी प्रभू श्रीराम यांना शस्त्रागार दाखवले

अकोले : अकोलेची भूमी अत्यंत असामान्य असून दक्षिणेतील पहिला आश्रम येथे स्थापन झाला. या आश्रमात अगस्ती ऋषींनी प्रभू श्रीराम यांना शस्त्रागार दाखवले आणि रावणाचा वध करण्यासाठी अमोघ बाण दिला. राक्षसांचा विनाश करण्यात या पवित्र आश्रमाचे मोठे महत्त्व आहे, असे प्रतिपादन अयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गुरु गोविंदगिरीजी महाराज यांनी केले.
अकोले येथील ऐतिहासिक अगस्ती आश्रमात पुरुषोत्तम अधिक मास निमित्ताने महिनाभर आयोजित अखंड कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. या प्रसंगी अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हा कार्यवाह दीपक जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना महाराज म्हणाले की, भारत राष्ट्र हे धर्माच्या आधारावर अधिष्ठित असून सनातन धर्म हा समानतेचा संदेश देतो. अगस्ती महाराज लोपमुद्रा मातेसह येथे राहिले, तसेच त्यांनी याच भूमीत आदित्य हृदय स्तोत्राची निर्मिती केली, ज्यामुळे ही भूमी पावन झाली आहे. अमृतवाहिनी प्रवरा नदीचे पाणी औषधी आणि शुद्ध असून, याच नदीतीरावर अकोल्यात अगस्ती आश्रम तर नेवासा येथे ज्ञानेश्वरीचे लिखाण झाले, हा मोठा ऐतिहासिक ठेवा आहे.
या वेळी आमदार किरण लहामटे यांनी अगस्ती देवस्थानचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ यांनी प्रभू श्रीराम कॉरिडॉरमध्ये अगस्ती देवस्थानचा समावेश करण्यासाठी महाराज यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात बसवण्यात आलेली अगस्ती ऋषींची मूर्ती ही अकोले आश्रमातील मूर्तीचीच प्रतिकृती आहे, हा अकोलेकरांसाठी मोठा गौरव असल्याचे मत दीपक महाराज देशमुख यांनी व्यक्त केले.

COMMENTS