अहिल्यानगर : आरोग्य विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि शाळेमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १२ लाख ७५ हजार रुपया

अहिल्यानगर : आरोग्य विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि शाळेमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १२ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बनावट नियुक्ती आदेश (फेक अपॉइंटमेंट लेटर) देऊन दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी विठ्ठल रेवन्नाथ पाटेकर (वय ३२, रा. बोल्हेगाव, शिवबा चौक, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश मार्शल भिंगारदिवे, उषा मंगेश भिंगारदिवे (दोघे रा. भिस्तबाग चौक), नितीन बाळासाहेब जाधव (रा. अहिल्यानगर), कालिदास बेळगे (रा. पाथर्डी), दिवाकर नादी (रा. पिंपळे गुरव, जि. पुणे) आणि बाळासाहेब केदार (रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, मुख्य आरोपी मंगेश भिंगारदिवे याने पाटेकर यांना आरोग्य विभागात लॅब टेक्निशियन पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी विविध टप्प्यांवर ६ लाख रुपयांहून अधिक रक्कम घेण्यात आली. तिथे नोकरी न मिळाल्याने, आरोपींनी बँकेत नोकरी लावतो असे सांगून इतर साथीदारांच्या मदतीने आणखी पैसे उकळले. मार्च २०२४ मध्ये ४ लाखांचा धनादेश आणि मे २०२४ मध्ये ३ लाख रुपये रोख घेण्यात आले. जून २०२४ मध्ये फिर्यादीला एसबीआयचा कथित नियुक्ती आदेश देण्यात आला; मात्र हा आदेश पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. तोफखाना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS