नांदेड : राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) आणि गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यास स्

नांदेड : राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) आणि गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यास स्पष्ट मनाई केली आहे. असे असतानाही तामसा (ता. हदगाव) येथील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये सक्तीने वसूल केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित शाळेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी एलसी व गुणपत्रिका मिळणे आवश्यक असते. मात्र, तामसा येथील या शाळेत “प्रथम १०० रुपये जमा करा, तरच कागदपत्रे मिळतील,” अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याची चर्चा आहे. कागदपत्रे वेळेत मिळावीत म्हणून अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उसनवारी करून हे पैसे भरावे लागल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्यांना स्पष्ट निर्देश देत एलसी व गुणपत्रिकेसाठी शुल्क आकारणार्या शाळांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वसूल केलेली रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्याचेही निर्देश आहेत. शासनाच्या या स्पष्ट नियमानंतरही तामसा येथे सुरू असलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून, विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे तात्काळ परत मिळवून द्यावेत, अशी मागणी तामसा परिसरातील पालक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी केली आहे.

COMMENTS