Homeमहाराष्ट्र

१९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र ‘एल निनो’ सक्रिय; मान्सूनवर संकटाची छाया, दुष्काळाची भीती वाढली

मुंबई : प्रशांत महासागरातील हवामानातील बदलांमुळे 'एल निनो' ही घटना अधिकृतपणे सक्रिय झाल्याची घोषणा अमेरिकेच्या हवामान अंदाज संस्थेच्या हवामान पूर

घरावर झाड कोसळून नुकसान
वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी
१० जूनपूर्वी मान्सूनच्या आगमनाची शक्यता धूसर; राज्यात वादळी पावसाचा अंदाज, पेरणीची घाई टाळण्याचे आवाहन

मुंबई : प्रशांत महासागरातील हवामानातील बदलांमुळे ‘एल निनो’ ही घटना अधिकृतपणे सक्रिय झाल्याची घोषणा अमेरिकेच्या हवामान अंदाज संस्थेच्या हवामान पूर्वानुमान केंद्राने केली आहे. यंदाचा एल निनो १९५० नंतरच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, डिसेंबरपर्यंत त्याची तीव्रता अत्यंत वाढू शकते. याचा परिणाम भारतासह जगातील अनेक भागांतील हवामानावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही आठवड्यांपासून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पूर्वीची तटस्थ स्थिती संपुष्टात येऊन एल निनोची निर्मिती झाली आहे. उपलब्ध अंदाजानुसार, ही स्थिती पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून फेब्रुवारी २०२७ पर्यंतही त्याचा प्रभाव टिकून राहू शकतो. एल निनोची तीव्रता वाढत गेल्यास जागतिक हवामानात मोठे बदल घडतात. भारतीय उपखंडासाठी याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता. पाऊस पूर्णपणे थांबतो असे नसले तरी त्याचे वितरण असमान होते. काही भागांत पावसाची कमतरता जाणवते, तर काही ठिकाणी परिस्थिती तुलनेने सामान्य राहू शकते.

हवामान अभ्यासकांच्या मते, यंदाचा एल निनो अत्यंत तीव्र स्वरूप धारण करू शकतो. महासागरातील तापमान सरासरीपेक्षा दोन ते अडीच अंशांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे मान्सूनच्या प्रवासावर तसेच त्याच्या सक्रिय आणि विश्रांतीच्या कालखंडांवर परिणाम होऊ शकतो. जूनपासूनच एल निनो सक्रिय झाल्याने संपूर्ण पावसाळी हंगाम त्याच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदाच्या पावसाबाबत सरासरीपेक्षा कमी प्रमाणाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला आहे. काही प्रदेशांमध्ये पावसाचे प्रमाण आणखी घटल्यास दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः आधीपासून कमी पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये याचा अधिक परिणाम जाणवू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या सध्याच्या संथ प्रगतीमागे एल निनोचा अप्रत्यक्ष प्रभाव असू शकतो. वातावरणातील ढगांची हालचाल नियंत्रित करणारे विविध घटक सध्या भारतीय उपखंडापासून दूर सक्रिय आहेत. त्याचबरोबर बाहेरील कोरड्या वाऱ्यांमुळेही मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. या सर्व प्रक्रियांमध्ये एल निनोची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. हवामान तज्ज्ञांचे मत आहे की, आगामी काही महिने शेती, जलसाठे आणि पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. एल निनोची वाढती तीव्रता लक्षात घेता मान्सूनच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

COMMENTS