नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत जिल्ह्यातील अनेक प्रमुख लोकप्रतिनिधींनीच पाठ फिरवल्याने भाजपतील अंतर्गत गटबाजी आणि महायुतीतील विसंवाद पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महायुतीच्या उमेदवारासाठी निवडणूकपूर्व रणनीती आखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी आणि मित्रपक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसून आले. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या चेहऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने उपस्थितीपेक्षा अनुपस्थितीच अधिक चर्चेचा विषय ठरली.
भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, नायगावचे आमदार राजेश पवार, मुखेडचे आमदार तुषार राठोड तसेच भाजप ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संतोषराव हंबर्डे हे बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतः उपस्थित असताना जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची गैरहजेरी ही केवळ योगायोग मानायची की नाराजीचे संकेत, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला अवघे दोन आमदार आणि एक जिल्हाध्यक्ष उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संघटनात्मक ताकदीचा दावा करणाऱ्या भाजपसमोरच उपस्थितीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जे महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याची ताकद दाखवू शकले नाहीत, ते विधान परिषद निवडणुकीचे नेतृत्व कशाच्या बळावर करणार? असा सवालही पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून आणि राजकीय निरीक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
याहून महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीचा उमेदवार असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांच्या एकाही आमदाराला अथवा प्रमुख पदाधिकाऱ्याला बैठकीचे निमंत्रणच देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीतील समन्वय आणि संवादावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक तोंडावर असताना मित्रपक्षांना विश्वासात न घेता स्वतंत्रपणे बैठक घेण्यामागील राजकीय गणित काय, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या बैठकीत काही स्वयंघोषित नेत्यांची उपस्थिती मात्र विशेष लक्षवेधी ठरली. पक्षाच्या अधिकृत जबाबदारीत नसलेल्या काही व्यक्ती बैठकीत सक्रिय दिसून आल्याने त्यांच्या उपस्थितीमागील नेमके कारण काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ते अधिकृत निमंत्रित होते की स्वतःहून उपस्थित राहिले, याबाबत पक्षाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. विधान परिषद निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना पक्षातील प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती, मित्रपक्षांना डावलल्याच्या चर्चा आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळे भाजप आणि महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचा दावा मात्र कमकुवत होताना दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर उघडपणे न दिसणारे अंतर्गत मतभेद आता बैठकींच्या उपस्थितीतूनच समोर येऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून, आगामी काळात याचा निवडणुकीवर कितपत परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS